विठ्ठलभक्तीचा संगम अन् कुंद्याचा गोडवा-विठ्ठलदेव गल्ली
भक्ती, उद्योग, संस्कृतीचा सुंदर संगम : बेळगावच्या सांस्कृतिक नकाशावर गल्लीचं स्वत:चं वेगळं स्थान
अमित कोळेकर/बेळगाव
बेळगावच्या शहापूर उपनगरातील विठ्ठलदेव गल्ली ही नावाप्रमाणेच भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे. विठ्ठलनामाच्या भजनात तल्लीन झालेल्या या गल्लीत असंख्य मंदिरे, पारंपरिक साड्यांची दुकाने आणि बेळगावच्या प्रसिद्ध कुंद्याचा उगम झालेला गोडवा, हे सर्व मिळून या परिसराची स्वतंत्र ओळख घडवतात.
या गल्लीचा उल्लेख होताच सर्वप्रथम मनात येते ते मंदिरांचे वैभव. सुरुवातीला महादेव मंदिर, त्यानंतर श्री नामदेव विठ्ठल मंदिर, श्री राधामुरलीधर मंदिर, श्री बालाजी मंदिर, श्री वेंकटरमण मंदिर आणि शेवटी ब्राह्मण समाजाचे पुरातन श्री विठ्ठल मंदिर या सर्व मंदिरांनी मिळून या गल्लीत आध्यात्मिक वातावरण फुलवले आहे. श्री नामदेव दैवकी संस्थेचे नामदेव विठ्ठल मंदिर येथे वर्षभर तिथीनुसार धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. तर राजस्थानी मारवाडी समाजाचे श्री लक्ष्मी नारायण व बालाजी मंदिर हे सुमारे 120 वर्षांपूर्वी स्थापन झाले असून आजही तेवढ्याच भक्तिभावाने चालवले जाते. श्री वेंकटरमण मंदिराचे संपूर्ण बांधकाम सागवानी लाकडामध्ये झालेले असून त्यावरील नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. याच मंदिरातील नक्षीदार लाकडी रथ दरवर्षी प्रदक्षिणा काढताना भक्तांची गर्दी ओसंडून वाहते. या गल्लीत आणखी एक प्राचीन श्री विठ्ठल मंदिर असून त्याचा इतिहास सुमारे 400 वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. या सर्व मंदिरांमुळे विठ्ठलदेव गल्ली ही बेळगावच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू ठरली आहे.
बेळगावच्या दक्षिण भागातील शहापूर हे ‘साड्यांचं माहेरघर’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि या परंपरेचा पाया म्हणजे विठ्ठलदेव गल्ली. अनेक दशकांपासून येथे रेशमी, पॉलिस्टर, हॅण्डलूम आणि पॉवरलूम साड्यांचे उत्पादन आणि विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जाते. नारायणपेठ, कांजीवरम, बनारसी, पैठणी तसेच स्थानिक ‘शहापूर साड्या’ या केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण देशभर लोकप्रिय आहेत. दूरदर्शनवरील निवेदिका आणि चित्रपटातील अभिनेत्री याच साड्यांमध्ये झळकताना दिसतात, हीच या कलेच्या गुणवत्तेची खरी साक्ष आहे.
विठ्ठलदेव गल्लीचा आणखी एक अभिमान म्हणजे कुंदा-बेळगावचा प्रसिद्ध गोड पदार्थ. या गोड पदार्थाचा उगम याच गल्लीत झाला आणि त्याचे जनक होते प्रसिद्ध मिठाईकार गजानन मिठाईवाले (जकू मारवाडी). त्यांनीच पहिल्यांदा कुंदा तयार केला आणि पुढे ही चव सातासमुद्रापार पोहोचली. आज ‘कुंदानगरी बेळगाव’ हे नाव या गल्लीतल्या त्या पहिल्या मिठाईवाल्याच्या कर्तृत्वामुळेच उदयास आलं आहे. बेळगावात येऊन ज्याने कुंदा चाखला नाही, त्याची भेट अपूर्णच मानली जाते-इतकी या मिठाईची लोकप्रियता आहे.
विठ्ठलदेव गल्ली केवळ मंदिरांची किंवा कारखान्यांची गल्ली नाही; ती आहे लोकजीवनाची धडधड. येथील नागरिक भक्तिभाव, श्रम आणि संस्कृती या तीन आधारांवर आपलं जीवन जगतात. प्रसिद्ध ‘रवी पान शॉप’ हे या गल्लीचं आणखी एक वैशिष्ट्या-ज्याच्याशिवाय या गल्लीचा उल्लेखच अपूर्ण वाटतो.
आजही या गल्लीत पारंपरिक सण-उत्सव उत्साहात साजरे होतात. विठ्ठलाच्या आरतीचे सूर आणि भजन कीर्तनात न्हालेली भक्तमंडळी एकत्र दिसून येतात आणि त्यामुळेच या ठिकाणाचं वेगळेपण टिकून आहे. भक्ती, उद्योग आणि गोडवा या तिन्ही घटकांनी विठ्ठलदेव गल्लीने बेळगावच्या सांस्कृतिक नकाशावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विठ्ठलदेव गल्ली म्हणजे भक्तीचा स्पर्श, परंपरेची सुगंधी झुळूक आणि गोडव्याची चव यांचं अप्रतिम मिश्रण आहे. ही गल्ली केवळ रस्त्याचं नाव नाही, तर ती आहे बेळगावातील शहापूर भागाच्या आत्म्याचे प्रतीक. भक्तीने उजळलेली, श्रमाने सजलेली आणि परंपरेने समृद्ध अशी ही गल्ली आजही प्रत्येकाच्या मनात विठ्ठलनामासारखी गुणगुणत राहते.
‘माझं वेणुग्राम’ या विशेष मालिकेद्वारे बेळगावच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने नटलेल्या गल्ल्यांच्या कहाण्या उलगडल्या जात आहेत. या मालिकेतून वाचकांना शहरातील प्रत्येक गल्लीचा आत्मा, तिचं मंदिर वैभव, परंपरा आणि लोकजीवन अनुभवता येईल. प्रत्येक भागात बेळगावच्या विस्मृतीत गेलेल्या पण आजही जिवंत असलेल्या वारशाची नवी पानं उघडली जातील. ही मालिका केवळ इतिहासाचा मागोवा घेणार नाही तर आजही संस्कृतीचा दीप जपणाऱ्या गल्ल्यांचा सन्मान करेल. वाचकांनी आणि प्रेक्षकांनी ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनलवर तसेच दैनिक आवृत्तीत या मालिकेचे भाग पाहावेत.
‘माझं वेणुग्राम’ही मालिका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होत असून बेळगावच्या ओळखीचा नवा आयाम सादर करते. या मालिकेतून आपल्या शहराच्या वैभवशाली वारशाचा भाग बनण्याचं आमंत्रण प्रत्येक बेळगावकराला आहे.