काँग्रेस विधीमंडळ गटात संघर्ष
आमदार कार्लोस फेरेरा यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार : भाजप, सरकारच्या कार्यक्रमांना फेरेरांची उपस्थिती
पणजी : गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ गटात मतभेद निर्माण होऊन संघर्ष उफाळून आला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हळदोणचे आमदार अॅड कार्लोस फेरेरा यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तोफ डागली असून लेखी तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या ऐन तोंडावर काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. आता फेरेरा कोणती भूमिका बजावतात ते महत्त्वाचे ठरणार आहे. पाटकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवली असून त्यांच्या प्रती पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस अंजली निंबाळकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना देण्यात आल्या आहेत.
आमदार फेरेरा हे आलेक्स सिक्वेरा यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर भाजपच्या कुडचडे फेसबुकवरही फेरेरा दिसून आले. एवढेच नव्हे, तर भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांच्या वाढदिवसालाही त्यांनी हजेरी लावली. भाजपच्या जनता दरबारातही ते सहभागी झाले. पण कुडचडेत ‘संविधान बचाव’ या काँग्रेसच्या कार्यक्रमास त्यांनी दांडी मारली. हे सर्व प्रकार काँग्रेस पक्षाच्या शिस्तीत बसत नाहीत. त्यांनी पक्षीय शिस्तभंग केला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे, यावर पाटकर यांनी तक्रारीत भर दिला आहे.
पाटकर यांनी हसे करुन घेतले : फेरेरा
पाटकर यांची तक्रार म्हणजे पोरखेळ असून ते अविचाराने वागत आहेत. त्यांनी हे सर्व करण्यापूर्वी आपल्याशी चर्चा करणे आवश्यक होते. परंतु ते चुकीच्या पद्धतीने वागले. हे प्रकरण प्रसारमाध्यमांकडे पोहोचवून त्यांनी स्वत:चे हसे करुन घेतले आहे, असे आमदार कार्लुस फरेरा यांनी नमूद केले. आपल्या कृतीचा पक्षीय राजकारणाशी काही संबंध नाही. राजकारणात मैत्री असू शकते, ती निभावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचा वाटेल तो अर्थ कोणी काढू नये. या प्रकरणाचे कोणी राजकारण करु नये, असे स्पष्टीकरण फरेरा यांनी दिले.
पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील : आलेमांव
विरोधी पक्षेनेते युरी आलेमांव यांनी फेरेरा तक्रार प्रकरणी सांगितले की, आपले लक्ष विधानसभा अधिवेशनाकडे असून तेथे कोणते विषय मांडायचे याला प्राधान्य आहे. फेरेरा प्रकरणी आपणास जास्त बोलायचे नाही. तो विषय पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला असून तेच काय तो निर्णय घेतील, असे सांगून आलेमांव यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दर्शवला.
माणिकराव ठाकरे हेच निर्णय घेतील : अमित पाटकर
कांग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी अनेकवेळा पक्षशिस्त मोडलेली आहे. याबाबत त्यांच्याशी अनेकदा चर्चाही केली. पक्षाची शिस्त राखण्याचे काम सर्वांचे आहे. पक्षविरोधी कारवाया किंवा पक्षशिस्त जर राखली जात नसेल, तर यामध्ये पक्षाचेच नुकसान आहे. पक्षशिस्तीबाबत काँग्रेस प्रदेश समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी अनेकवेळा सूचना केलेली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता माणिकराव ठाकरे हेच शिस्तभंगाबाबत निर्णय घेतील, असे अमित पाटकर यांनी सांगितले.


