महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संघर्ष : धार्मिक आणि राजकीय

09:52 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगावसह राज्यात गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पडला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये यादरम्यान दंगली घडवण्याचे कुटील डाव रचले गेले. पण सुदैवाने याचे पडसाद मात्र मोठ्या प्रमाणात इतरत्र उमटले नाहीत, ही दिलासादायी बाब होय. एकीकडे धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे राज्यात काँग्रेस-भाजप दोन्ही पक्षात अंतर्गत राजकीय पेच निर्माण होताना दिसतो आहे. एकंदरच वातावरण काहीसे गढूळलेले आहे, असे म्हणायला जागा आहे.

Advertisement

बेळगावसह कर्नाटकात गणेशोत्सव शांततेत पार पडला आहे. कर्नाटकातील विविध शहरात उत्सवाच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी पाचव्या व सातव्या दिवशींच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी दंगलीही घडल्या. पण ज्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटायला हवे होते, त्या प्रमाणात ते उमटले नाहीत. मंड्या जिल्ह्यातील नागमंगल, मंगळूर येथील बंटवाळ, चिक्कमंगळूर, कोलार, दावणगिरी, चित्रदुर्ग येथे काही घटना घडल्या. काही जिल्ह्यात ईद इ मिलादच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे नाचवण्यात आले. या मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पॅलेस्टाईनचे समर्थन कर्नाटकात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागमंगल येथे घडलेली दंगल पूर्वनियोजित आहे, याची एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

Advertisement

कर्नाटकातील सद्यस्थिती लक्षात घेता अनेक जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे लक्षात येते. निवडणुका जवळ आल्या की दंगली ठरलेल्या असतात, असा आजवरचा अनुभव आहे. सध्या तरी कुठल्या निवडणुका नाहीत. तरीही कर्नाटकात अस्वस्थता आहे. सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडींचे परिणाम तरी अप्रिय घटनातून दिसत नसणार ना? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्या-मुंबईनंतर बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. उत्सवाच्या काळात वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील गणेशभक्त बेळगावला येतात. कर्नाटकातील इतर जिल्ह्यात घडलेल्या अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. काही किरकोळ घटना वगळता गणेशोत्सव शांततेत पार पडला आहे.

एकामागून एक बाहेर पडणारे घोटाळे, सत्ताधारी व विरोधकात एकमेकांना संपविण्यासाठी सुरू असलेली चढाओढ आदी कारणांमुळे राजकीय वातावरणही गढूळ झाले आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्ष संपविण्यासाठी गेल्या आठवड्यात संघ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कोणत्याही परिस्थितीत पक्षात एकतर्फी निर्णय घ्यायचा नाही. मुडा येथील भूखंड घोटाळा, महर्षी वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचार आदी प्रकरणे सरकारला अडचणीत आणणारी आहेत. जनमानसात आपली प्रतिमा सुधारून काँग्रेसला जेरीस आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपापसात भांडण करत बसण्यापेक्षा काँग्रेस सरकारचे घोटाळे लोकांसमोर आणून आंदोलन उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. कोणीही पक्षाची शिस्त मोडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आता भाजपमधील मतभेद दूर झाले, पक्षाचे नेते मतभेद विसरून एकत्र आले, अशीच बहुतेकांची समजूत होती. या बैठकीनंतर केवळ दोन-तीन दिवसातच ही समजूत खोटी ठरली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवणारे माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेण्यात आली. महर्षी वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचारातून मिळविलेल्या पैशाचा लोकसभा निवडणुकीत वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यासमवेत रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा आदींसह बंडाचा पवित्रा घेतलेले अनेक नेते या शिष्टमंडळात होते. यावरून शिष्टाईसाठी झालेली बैठक यशस्वी झाली नाही, हेच दिसून येते.

बेंगळूर सदाशिवनगर येथील राष्ट्रोत्थान केंद्रामध्ये झालेल्या बैठकीनंतर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आम्ही विजयेंद्रला नेता मानत नाही. त्यांचे वडील बी. एस. येडियुराप्पा यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. मात्र, विजयेंद्रना आम्ही मानणार नाही. विजयेंद्र म्हणजेच भ्रष्टाचाराचा ब्रँड आहे, अशा शब्दात टीका केली आहे. त्यामुळे नेतृत्व बदलाशिवाय भाजपमधील हा संघर्ष थांबणार नाही, हे स्पष्ट होताना दिसत आहे. राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष व सहकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी भाग घेतलेल्या बैठकीनंतरही विजयेंद्र विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन आपले वेगळे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. खरेतर एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर तरी या नेत्यांना शहाणपण यायला हवे होते. पक्षाच्या निदर्शनास आणून न देता स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पक्षाध्यक्षांनी हायकमांडची परवानगी मागितली आहे. किमान त्यांना नोटीसा जरी दिल्या नाहीत तर पक्षाच्या विकासाला खीळ बसणार आहे, अशी भूमिका विजयेंद्र यांनी हायकमांडसमोर मांडली आहे. भाजपमधील हा संघर्ष तूर्त तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

राजराजेश्वरीनगरचे भाजप आमदार मुनिरत्न यांना अटक झाली आहे. जातीवाचक शिवीगाळ व सफाई कंत्राटदाराकडे 30 लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप भाजपने केला आहे. खास करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर टीका केली जात आहे. मुनिरत्न व शिवकुमार यांच्यात आधीपासूनच राजकीय संघर्ष आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या व्यासपीठांवरून ते आधी उघडही झाले होते. मुनिरत्न हे याआधी काँग्रेसमध्ये होते. ऑपरेशन कमळमुळे कमळच्या माध्यमातून ते भाजपमध्ये आले. काँग्रेस सोडल्यापासून माझ्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांचे षड्यंत्र सुरूच आहे. या षड्यंत्राचाच भाग म्हणून आपल्याला अटक करण्यात आल्याचे मुनिरत्न यांनी सांगितले आहे. राजकारणातून एकमेकांना संपवण्यासाठी कर्नाटकात सुरू असलेला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतो आहे. भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध आघाडी उघडल्यामुळे भाजपच्या काळातील घोटाळ्यांची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. हा संघर्ष असाच सुरू राहिला तर वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेत्यांना कारागृहात जावे लागणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही सिद्धरामय्या सरकार अस्तित्वात आल्यापासून आजतागायत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खटले दाखल करण्यासाठी लोकायुक्त विभागाकडून किती प्रस्ताव आले आहेत, याची माहिती पुरविण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना पत्र पाठवले आहे. राजभवन व राज्य सरकार यांच्यातील संघर्षही सुरूच आहे. काँग्रेसमधील परिस्थितीही भाजपपेक्षा काही वेगळी नाही. सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील सुमारे सात मंत्र्यांना डिसेंबर अखेरपर्यंत मंत्रिमंडळातून वगळण्याची तयारी सुरू आहे. सरकारची प्रतिमा वाढविण्याची क्षमता असणाऱ्या प्रभावी नेत्यांना मंत्रीपद देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत हे बदल होणार, अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article