पाकिस्तान-तालिबानमध्ये संघर्ष पेटला
58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा तालिबानचा दावा : 25 चौक्याही ताब्यात
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, काबूल
पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमध्ये शनिवारी रात्री उशिरा ड्युरंड रेषेवर भीषण चकमकी झाल्या. पाकिस्तानने काबूलमधील पाकिस्तानी तालिबानच्या (टीटीपी) एका तळाला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली. अफगाण अमिरातीचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असताना हा संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, तालिबानने 58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा आणि 25 चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
अफगाणिस्तानने शनिवारी रात्री पाकिस्तान सीमेवर झालेल्या चकमकीत त्यांच्या सैन्याने 58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. अफगाण सुरक्षा दलांनी 25 पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या. या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तसेच 30 जण जखमी झाले, असे तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती देताना आमची कारवाई मध्यरात्री संपल्याचेही सांगितले. जर पाकिस्तानने पुन्हा अफगाण सीमेचे उल्लंघन केले तर आमचे सैन्य देशाचे रक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचेही स्पष्ट केले. अफगाण अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर राजधानी काबूल आणि देशाच्या पूर्वेकडील बाजारपेठेत बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला. तथापि, पाकिस्तानने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
‘इसीस’ दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप
तालिबानने पाकिस्तानवर ‘इसीस’ दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय दिल्याचा आरोप केला. मुजाहिदने या दहशतवाद्यांना अफगाणिस्तान आणि संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे सांगून त्यांना पाकिस्तानातून हाकलून लावण्याची किंवा अफगाणिस्तानात हलवण्याची मागणी केली. अफगाणिस्तानने अस्थिरता पसरवणारे सर्व घटक नष्ट केले आहेत, परंतु आता पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रदेशात त्यांच्यासाठी नवीन तळ स्थापित केले आहेत, असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले. याचवेळी त्यांनी कराची आणि इस्लामाबाद विमानतळांद्वारे या तळांवर नवीन लढाऊ आणले जात आहेत आणि त्यांना तेथे प्रशिक्षण दिले जात आहे. इराण आणि रशियामधील हल्ले देखील या पाकिस्तानी तळांवरून नियोजित होते, असेही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तानचाही इशारा
अफगाणिस्तानला भारतासारखेच योग्य उत्तर दिले जाईल, जेणेकरून ते पाकिस्तानकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असे पाकिस्तानी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आता तालिबानच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तान गप्प बसणार नाही; विटांचा दगडाने प्रत्युत्तर दिले जाईल, असे गृहमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानी माध्यम ‘डॉन’नुसार, पाकिस्तानी सैन्याने 19 अफगाण सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचे वृत्त देण्यात आले आहे.
सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ले
रेडिओ पाकिस्ताननुसार, अफगाणिस्तानातील हल्ले सीमेजवळील सहा भागात झाले. पाकिस्तानी सैन्यानेही प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. लढाईदरम्यान, पाकिस्तानी सैन्याने तीन अफगाण ड्रोन पाडले, ज्यात बॉम्ब असल्याचा संशय आहे, असे पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.
तीन दिवसांपूर्वी काबूलमध्ये हवाई हल्ला
9 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने हे हल्ले केले आहेत. जरी पाकिस्तानने हे हल्ले केल्याचे स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्यांनी तालिबानला त्यांच्या भूमीवर टीटीपीला आश्रय देऊ नये असा इशारा दिला. त्यानंतर, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांनी ‘पाकिस्तानने आमच्याशी खेळ खेळणे थांबवावे. आम्हाला चिथावू नका. एकदा ब्रिटन आणि अमेरिकेला विचारा; ते तुम्हाला समजावून सांगतील की अफगाणिस्तानसोबत असे खेळ योग्य नाहीत.’ असा सज्जड दम दिला होता.
कतार, इराण, सौदीकडून संयम बाळगण्याचे आवाहन
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही बाजूंना संवाद आणि संयमला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. संयम बाळगल्यास तणाव कमी होण्यास आणि संघर्ष टाळण्यास मदत झाल्यामुळे प्रादेशिक सुरक्षा व स्थिरता प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना परराष्ट्र मंत्रालयाने पाठिंबा दर्शविला आणि दोन्ही देशांच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. इराण आणि सौदी अरेबियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे तणाव कमी करण्याचे आवाहन केले. सौदी अरेबियाने प्रादेशिक शांततेला पाठिंबा दर्शविला.