कंबोडिया-थायलंडमध्ये संघर्षाचे पडघम
कंबोडियाच्या गोळीबारात 12 थाई नागरिक ठार : थायलंडचा कंबोडियन लष्करी तळांवर हल्ला, एफ-6 तैनात
वृत्तसंस्था/बँकॉक / फ्नोम पेन्ह
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादाचे पडघम तीव्र होण्याचे संकेत मिळत असून गुरुवारी सकाळी सीमेवर जोरदार गोळीबार झाला. कंबोडियन सैनिकांच्या गोळीबारात 12 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी 14 जण जखमी झाले आहेत. थायलंडने प्रत्युत्तर म्हणून कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर प्रथम हल्ला केल्याचा आरोप केला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थायलंडने सीमेवर एफ-16 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. सर्वप्रथम थाई सैनिकांनी गोळीबार केल्याचा आरोप कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तर कंबोडियाने प्रथम ड्रोनने हल्ला करण्यासोबतच तोफा आणि लांब पल्ल्याच्या बीएम-21 रॉकेटने हल्ला केल्याचे थाई सैन्याने म्हटले आहे. यावर्षी 28 मे रोजी सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. या हल्ल्यात एक कंबोडियन सैनिक ठार झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील वाद सुरूच आहे.
थायलंडने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
हल्ल्यानंतर थायलंडने सीमेवरील 86 गावांमधील सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. त्याचवेळी, कंबोडियामध्ये राहणाऱ्या थाई लोकांनाही त्यांच्या देशात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीमेवरील परिस्थिती बिकट होत असून हा संघर्ष बराच काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याने थायलंड दुतावासाने आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर कंबोडिया सोडण्यास सांगितले.
118 वर्षे जुना वाद
थायलंड आणि कंबोडियामधील सीमावादाचा इतिहास 118 वर्षांपासूनचा आहे. दोन्ही देशांमधील 817 किमी लांबीची सीमा 1907 मध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात असताना काढण्यात आली होती. थायलंडने नेहमीच त्याचा विरोध केला कारण नकाशामध्ये प्रेह विहार नावाचे ऐतिहासिक मंदिर कंबोडियाचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते. यावर दोन्ही देशांमध्ये वाद झाला. 1959 मध्ये कंबोडियाने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले आणि 1962 मध्ये न्यायालयाने मंदिर कंबोडियाचे असल्याचा निकाल दिला. थायलंडने ते मान्य केले परंतु आजूबाजूच्या जमिनीवरील वाद सुरूच राहिला.