एमएलआयआरसीतर्फे शरकत दिनाचे आचरण
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री येथे 106 वा शरकत दिन आचरण्यात आला. 1918 साली झालेल्या मेसापोटेमियम मोहिमेत ज्या 114 सैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ हा दिन आचरण्यात येतो. त्या काळी ‘114 मराठाज’ या बटालियनच्या सैनिकांनी धाडस, शौर्य यांचे दर्शन घडविल्याबद्दल त्यांना ‘शरकत’ हा युद्धसन्मान देण्यात आला. इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी शरकत युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी व सैनिकांनी बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांप्रती आदरांजली अर्पण केली. ज्यांनी अतुलनीय पराक्रमाचे प्रदर्शन घडवत इन्फंट्रीच्या शौर्याचा वारसा कायम राखला, त्यांचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. इन्फंट्रीमध्ये खास सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरकत बॅनर प्रशिक्षणार्थी टीमला देण्यात आले. स्नेहभोजनाने सांगता झाली.