सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : अधिकाऱ्यांची विकास आढावा बैठक
बेळगाव : ग्राम पंचायत अखत्यारित काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तालुका सार्वजनिक ऊग्णालयांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना हातमोजे, जॅकेट, हेल्मेट, बूट, चष्मा व सॅनिटायझर आदी सुरक्षा उपकरणे पुरवावीत, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. मंगळवारी जि. पं. सभागृहात आयोजित विविध विभागांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, स्वच्छ भारत अभियानअंतर्गत पीडब्ल्यूएम युनिट्समध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यंत्रे बसवून 2 ऑक्टोबर रोजी त्यांचे उद्घाटन करावे. गांधी जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करावी. प्रलंबित वैयक्तिक घरगुती शौचालये पूर्ण करण्याबाबत नियोजन करावे. गोकाक तालुक्मयात निर्माण करण्यात येणाऱ्या एमआरएफ (मटेरियल रिकव्हरी पॅसिलिटी) युनिटचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.
क्षारपड शेतजमिनीचा विकास, ग्रे वॉटर मॅनेजमेंट युनिट 1.0 व 2.0, एकत्रीकरण अंतर्गत मसाले पीक, हरितक्रांती, शेतकरी विकास व कृषी कवच यासारख्या सरकारी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कार्यक्रमांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी. रोहयोअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना सतत काम द्यावे. ग्रा. पं. व ता. पं.च्या संबंधित अधिकाऱ्यांनी एनएमएमएसची तपासणी करावी. पुढील बैठकीत प्रगती दिसून न आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला.
सामाजिक लेखापरीक्षणाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे ता. पं. ईओंनी निकाली काढावीत. लोकपालांनी सूचविलेली रक्कम वसूल करण्यात यावी. 1 कोटी 92.18 लाख ऊपयांची थकबाकी वसुलीबाबत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी रायबाग ता. पं. ईओंना दिले. सकाळ योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज पुढील 2 दिवसांत निकाली काढण्यासाठी पावले उचलावीत. 15 व्या आर्थिक योजनेंतर्गत कामांची पाहणी करून प्रत्यक्ष झालेल्या कामाचे पैसे द्यावेत. ग्रा. पं. इमारतींचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जलजीवन मिशन प्रकल्पाची कामे पूर्ण करून ग्रा. पं. कडे सोपवून गावाला हर घर जल ग्राम म्हणून घोषित करावे. मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रा. पं. हद्दीतील पाणी संकलन केंद्राची स्वच्छता व सुरक्षितता निश्चित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या केंद्रांच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची सूचनाही शिंदे यांनी दिली. यावेळी जि. पं. उपसचिव बसवराज हेग्गनायक, बसवराज आडवीमठ, योजना संचालक रवी बंगारेप्पनवर, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर यांच्यासह खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.