माजी मंत्री बी. नागेंद्र यांना सशर्त जामीन
प्रतिनिधी/ बेंगळूर
महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या माजी मंत्री बी. नागेंद्र यांना सशर्त जामीन मिळाला आहे. बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने हा आदेश दिला असून 2 लाखांचा बॉण्ड आणि दोघांची हमी या अटीवर नागेंद्र यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागेंद्र यांच्याविरुद्ध 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मागील आठवड्यात 970 पानी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात नागेंद्र हे पहिले आरोपी आहेत. नागेंद्र आणि इतर काहीजण या प्रकरणात सामील असल्याची पुष्टी ईडीच्या तपासात झाली आहे. 187 कोटीपैकी 84 कोटी रुपयांच्या अवैध व्यवहाराचा उल्लेख ईडीने आरोपपत्रात केला आहे. शिवाय साक्षीदार नष्ट करण्याचा कटही रचण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बळ्ळारी लोकसभा निवडणुकीवेळी वाल्मिकी निगममधील पैसा वापरला गेल्याचे तपासातून समोर आले आहे. प्रकरणातील आठवा आरोपी विजयकुमार (नागेंद्र यांचा स्वीय साहाय्यक) याच्या मोबाईलमध्ये निवडणुकीसाठी पैशांच्या वापरासंबंधी कागदपत्रे आढळली होती. 20 कोटी 19 लाख रुपये नोटाच्या बंडलाची छायाचित्रे व प्रत्येक बूथवर वाटप केलेल्या पैशांच्या नोंदी सापडल्या होत्या.