करंबळ क्रॉस-नदीपर्यंतच्या रस्ताकामाच्या काँक्रिटीकरणास आजपासून प्रारंभ
21 दिवस रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन
खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंगळवार दि. 11 पासून हाती घेण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा करंबळ क्रॉस ते नदीपर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुचाकीसह सर्व वाहतूक पूर्णपणे पुढील 21 दिवस बंद करण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले आहे. शहरांतर्गत राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापूर्वीपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी जो आराखडा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्या आराखड्यानुसारच रस्त्याचे काम करण्यात येत आहे. आराखड्यात करण्यात आलेल्या तरतुदीनुसारच रस्त्याचे काम करण्यात येत आहे.
कामांबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
करंबळ क्रॉस ते मासळी मार्केटपर्यंत साडेपाच मीटर रुंद रस्ता करण्यात येणार आहे. तसेच मऱ्याम्मा मंदिरापासून मराठा मंडळपर्यंत हाही रस्ता साडेपाच मीटरच करण्यात येणार आहे. मऱ्याम्मा मंदिर ते नवीन मासळी मार्केटपर्यंत हा रस्ता दुपदरीकरण प्रमाणेच हा रस्ता नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. रस्ताकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना उपस्थित राहून कामाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदाराशी संपर्क साधून समजावून देवून आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावे.
गैरसमजुतीतून आडकाठी आणू नये
रस्त्याच्या कामात कोणत्याही गैरसमजुतीतून आडकाठी आणू नये, जे आराखड्यात नोंद आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचे काम होत असताना प्रत्यक्ष पाहणी करून काही तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आले आहे.