संरक्षण सज्जतेसाठी ठोस पावलं !
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताला जरी थेट पाकिस्तानशी लढावं लागलेलं असलं, तरी पडद्याआडून त्यांना शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत मदत करणारा चीन नि तुर्की अशा तिघांचा सामना आपल्याला कसा करावा लागला ते पुन्हा एकदा समोर आलंय...अशा प्रकारे अनेकांशी एकाच वेळी झुंजण्याचा प्रसंग येऊ शकतो हे ध्यानात घेऊन भारत बऱ्याच काळापासून संरक्षण सज्जता वाढविण्याच्या कामाला लागलाय. याअंतर्गत एक महत्त्वाचा भाग म्हणजे नौदल. त्यांच्या ताफ्यात दोन युद्धनौका नुकत्याच सामील झाल्याहेत...दुसरीकडे, ‘सिंदूर’च्या वेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘एस-400’च्या शिलल्क स्क्वॉड्रन्स लवकरच आपल्या पदरात पडणार असून या सर्वांबरोबर आपला प्रयत्न चाललाय तो अण्वस्त्र सज्जताही वाढविण्याचा...
भारतानं विदेशात बांधणी केलीय ती शेवटच्या युद्धनौकेची...3 हजार 900 टनांच्या या मल्टी-रोल स्टील्थ फ्रिगेटचं जलावतरण करण्यात आलंय ते रशियात 1 जुलै या दिवशी आणि तिचं नाव ‘आयएनएस तमाल’...‘सेन्सर्स’, विविध शस्त्रं नि ‘ब्राह्मोस’ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रं यांनी तिला सुसज्ज बनविलंय...भारतीय नौदल सध्या विविध शिपयार्डमध्ये निर्मिती करतेय ती 59 युद्धनौकांची आणि त्यांची किंमत 1.2 लाख कोटी रुपये. खेरीज नौदलानं मागणी केलीय ती अन्य 31 नवीन युद्धनौकांची आणि त्यात समावेश 9 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या, 7 नवीन पिढीतील ‘फ्रेगेट्स’ व 8 पाणबुडीविरोधी ‘कॉर्व्हेट्स’चा...
सध्या भारतीय नौदलाचं वर्णन ‘बायर्स नेव्ही टू बिल्डर्स नेव्ही’ असं करण्यात आल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. त्यानुसार भविष्यात एखादी युद्धनौका विदेशात बांधण्याची योजना नाही. नौदलाच्या मुठीत 140 युद्धनौका व पाणबुड्या असून त्यांना साथ मिळतेय ती 250 विमानं नि हेलिकॉप्टर्सची. भारतानं पाहिलंय ते 2030 पर्यंत हा ताफा वाढवून 180 युद्धनौका आणि 350 विमानं व हेलिकॉप्टर्सपर्यंत नेण्याचा...पाकिस्तान अन् चीन यांच्या गट्टीमुळं नवी दिल्लीला गरज पडलीय ती अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकण्याची. चीनचं नौदल हे विश्वातील सर्वांत मोठं असून त्यांच्याकडे आहेत विविध प्रकारच्या तब्बल 370 युद्धनौका...
‘आयएनएस तमाल’ 125 मीटर्स लांब असून तिच्यात क्षमता आहे ती 30 नॉट्सचा वेग पार करण्याची. ‘तमाल’वर कार्यरत असतील नौदलाचे 250 जवान...ऑक्टोबर, 2018 मध्ये रशियाशी करार केला होता तो चार ‘ट्रिव्हाक-3’ वर्गातील ‘फ्रिगेट्स’साठी. पहिल्या दोन युद्धनौकांची निर्मिती रशियात करण्यात आलेली असून त्यासाठी आम्हाला ओतावे लागलेत 8 हजार कोटी रुपये. अन्य दोन ‘त्रिपूत’ आणि ‘तवस्या’ यांची बांधणी 13 हजार कोटी रुपयांच्या साहाय्यानं करण्यात येईल ती गोवा शिपयार्डमध्ये. त्याकरिता तंत्रज्ञानाचं हस्तांतरणही मॉस्कोनं केलंय...
पहिली ‘फ्रिगेट आयएनएस तशिल’ फेब्रुवारी महिन्यात रशियाहून कारवार इथं पोहोचली. यापूर्वी नवी दिल्लीनं मॉस्कोकडून सहा ‘फ्रिगेट्स’ (तीन ‘तलवार’ वर्गातील अन् तीन ‘टेग’ वर्गातील) 2003-04 मध्ये विकत घेतल्या होत्या. या सर्व फ्रिगेट्सवर अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली असून ‘आयएनएस तमाल’ ही इतरांहून जास्त ताकदवान बनविण्यात आलीय. ‘तमाल’वर ‘ब्राह्मोस’शिवाय जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रं, ‘ए-180-01’ 100 एम. एम. गनची सुधारित आवृत्ती अन् नव्या पिढीतील ‘इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इफ्रारेड संडालव्ही सिस्टम’ असेल. त्यांना साथ मिळेल ती ‘हेविवेट टॉर्पेडोस’ची व वेळ न गमावता पाणबुड्यांवर हल्ला करणाऱ्या रॉकेट्सची...
दरम्यान, नुकतीच माझगाव गोदीतून ‘आयएनएस उदयगिरी’ ही स्वदेशी बनावटीची ‘फ्रिगेट’ देखील प्राप्त झालीय. ही ‘प्रोजेक्ट 17ए’च्या अंतर्गत तयार झालेली दुसरी ‘स्टिल्थ फ्रिगेट’. ‘आयएनएस तमाल’प्रमाणं 6 हजार 670 टन वजनाची ‘उदयगिरी’ सुद्धा प्रगत सेन्सर्स आणि ‘ब्राह्मोस’सारख्या शस्त्रांनी सुसज्ज. या दोन्ही नौका ‘ब्लू-वॉटर ऑपरेशन्स’साठी सक्षम आहेत. ‘उदयगिरी’ हे नौदलाच्या ‘इन-हाऊस वॉरशिप डिझाइन ब्युरो’नं आखणी करून वितरित केलेलं 100 वं जहाज, तर ‘आयएनएस तमाल’ ही गेल्या 65 वर्षांत भारत-रशिया धोरणात्मक सहकार्यातून साकारलेली 51 वी नौका...
‘एस-400’च्या दोन स्क्वॉड्रन्स लवकरच भात्यात...
? रशियानं भारताला आश्वासन दिलंय ते ‘एस-400 ट्रायम्फ’ या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या अफलातून प्रणालीची शिल्लक दोन स्क्वॉड्रन्स 2027 पर्यंत सुपूर्द करण्याची...
? ‘एस-400 एअर डिफेन्स सिस्टम्स’च्या चौथ्या व पाचव्या स्क्वॉड्रन्स वेळेवर देणं रशिया-युक्रेन युद्धामुळं मॉस्कोला जमलेलं नाहीये. या प्रणालीनं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती...
? पहिली तीन स्क्वॉड्रन्स भारतीय हवाई दलाला देण्यात आलेली असून ती पाकिस्तान नि चीनचं आव्हान मोडीत काढण्यासाठी उत्तर-पश्चिम व पूर्व भारतात तैनात करण्यात आलीत...
? भारतानं पाच स्क्वॉड्रन्ससाठी 5.4 अब्ज डॉलर्स वा 40 हजार कोटी रुपयांचा करार केला होता तो 2018 साली आणि त्यानुसार 2023 पर्यंत सर्व भारताला मिळणार होत्या...
? प्रत्येक ‘एस-400 स्क्वॉड्रन’मध्ये दोन मिसाईल बॅटरीसचा समावेश असून 128 क्षेपणास्त्रं 120, 200, 250 आणि 380 किलोमीटर्स अंतरावरील शत्रूंची क्षेपणास्त्रं नि अन्य शस्त्रास्त्रांचा वेध घेण्यास सज्ज असतात...
? ‘एस-400 बॅटरीस’मध्ये क्षमता आहे ती स्वत:च लक्ष्यं शोधण्याची आणि बॉम्बर्स, जेट्स, हेरगिरी करणारी विमानं, क्षेपणास्त्र नि ड्रोन्स यांचे 380 किलोमीटर्स अंतरापर्यंत तीन तेरा वाजविण्याची...
? विशेष म्हणजे ‘डीआरडीओ’ देखील 350 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्याला उद्धवस्त करण्याची क्षमता असलेली ‘एअर डिफेन्स सिस्टम’ विकसित करत असून त्याला ‘प्रोजेक्ट कुशा’ असं नाव देण्यात आलंय...
? त्याच्या पाच स्क्वॉड्रन्सची मागणी भारतीय हवाई दलानं आताच केलेली असून त्यासाठी 21 हजार 700 कोटी रुपये द्यावे लागतील...2028-29 पर्यंत ही सिस्टम शत्रूचा वेध घेण्यासाठी सज्ज होईल अशी आशा बाळगण्यात आलीय...
वाढती अण्वस्त्र सज्जता...
स्टॉकहोम इंटरनॅशन पीस इन्स्टिट्यूट’नं (एसआयपीआय) नुकताच आपला नवीन अहवाल प्रसिद्ध केलाय नि त्यानुसार, बलाढ्या चीन दरवर्षी त्याच्या अण्वस्त्रांत भर टाकतोय ती 100 वॉरहेड्सची. हे प्रमाण भारताच्या तिप्पट...सध्या नवी दिल्लीनं इस्लामाबादवर काही प्रमाणात वर्चस्व मिळविलंय...जानेवारी, 2024 मध्ये 500 वॉरहेड्सवर ठाण मांडून बसलेल्या ड्रॅगननं सध्या 600 ना कवेत धरलंय. भारताच्या भात्यात 180, तर पाकिस्तानकडे 170 वॉरहेड्स लपलीत. विश्वातील चक्क 90 टक्के ‘न्युक्लिअर वेपन्स’ रशिया व अमेरिकेच्या ताब्यात आहेत...
‘स्टॉकहोम इंटरनॅशन पीस इन्स्टिट्यूट’च्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अण्वस्त्रांशी संबंधित लष्करी सुविधांवर भारतानं हल्ला केल्यानं विश्वाला भीती वाटू लागली होती ती आण्विक युद्धाला तोंड फुटण्याची. भारतानं सारगोधा व नूर खान हवाई तळांवर हल्ले केले. सारगोधा हा पाकच्या जमिनीखाली अण्वस्त्रं बनविण्याच्या सुविधेजवळ असून नूर खान ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन’ मुख्यालयाला भिडलाय...अहवालानुसार, चीनचं ‘न्युक्लिअर’ शस्त्रागार अन्य कुठल्याही देशाहून वेगानं वाढतंय आणि 2035 पर्यंत पोहोचेल ते 1500 वॉरहेड्सवर. भारत व पाकिस्ताननं 2024 मध्ये नव्या प्रकारची अण्वस्त्रं तयार करण्यास प्रारंभ केलाय अन् त्यात क्षमता आहे ती बॅलिस्टिक मिसाईल्सवर वॉरहेड्स बसविण्याची...आपण अण्वस्त्रांची क्षमता 172 वरून 180 वर नेलीय.
सध्या 5 हजार किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्य उद्धवस्त करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-5’ला साथ मिळतेय ती नव्या पिढीतील ‘अग्नी-प्राईम’ची. त्यांचा पल्ला 1 हजार ते 2 हजार किलोमीटर्स. त्यानं ‘अग्नी-1’ (700 किलोमीटर्स) नि ‘अग्नी-2’ (2 हजार किलोमीटर्स) यांचं स्थान पटकावलंय. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘अग्नी-5’ची ‘मल्टिपल वॉरहेड्स’च्या भारासह चाचणी घेण्यात आलीय...पाकही बॅलिस्टिक व क्रूझ मिसाईल्सची निर्मिती करण्यात मग्न असून त्यात समावेश ‘बाबर-3’सारख्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा. त्यांना ‘ऑगस्टा-90 बी डिझेल इलेक्ट्रिक’ पाणबुड्यांवर बसविण्यात येईल...भारताचा विचार केल्यास सध्या आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘आयएनएस अरिहंत’ व ‘आयएनएस अरिघात’ या पाणबुड्या असून त्यांच्याहून मोठी ‘आयएनएस अरिधामन’ लवकरच शत्रूचे मनसुबे उधळवून लावण्यासाठी ताफ्यात जमा होईल...
नवी पावलं...
? संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण मंडळानं नुकतीच मंजुरी दिलीय ती सुमारे 1.05 लाख कोटी ऊपयांच्या भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना. कारण देशाचं सैन्य नवीन संरक्षण उपकरणं खरेदी करण्यास उत्सुक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रस्ताव भारतीय कंपन्यांच्या साहाय्यानं मार्गी लावले जाणार असून ते आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम, तिन्ही दलांसाठी एकात्मिक ‘कॉमन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम’ आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीशी निगडीत आहेत...
? दुसरीकडे, भारत नि अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेनंतर बहुप्रतीक्षित ‘अपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर्स पुढील दोन आठवड्यांत थडकतील असं दिसून येतंय. संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानं त्यांना अमेरिकेकडून तीन अपाचे एएच-64 ई अॅटेक हेलिकॉप्टर्सची पहिली तुकडी 15 जुलैपर्यंत वितरित केली जातील असं कळविण्यात आल्याची पुष्टी केलीय...पुढील तीन हेलिकॉप्टर्सची तुकडी दाखल होईल ती यावर्षी नोव्हेंबरपर्यंत...
? 2020 मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या 600 दशलक्ष डॉलर्सच्या करारांतर्गत भारतीय लष्कराला सहा ‘एएच-64 ई’ अपाचे अॅटेक हेलिकॉप्टर्स मिळायची असून यासंदर्भातील मुदत अनेक वेळा हुकलीय. मुळात ती मे-जून 2024 मध्ये प्राप्त व्हायची होती, परंतु पुरवठा साखळीतील व्यत्ययांकडे बोट दाखवून मुदत नंतर डिसेंबर, 2024 पर्यंत पुढं ढकलण्यात आली...
देशांजवळ असलेली वॉरहेड्स...
देश वॉरहेड्स
रशिया 4309
अमेरिका 3700
चीन 600
फ्रान्स 290
ब्रिटन 225
भारत 180
पाकिस्तान 170
इस्रायल 90
उत्तर कोरिया 50
संकलन : राजू प्रभू