इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आचरा नगरी दुमदूमली
आचरा प्रतिनिधी
आचरा सागरकिनारी काहीसे भावूक झालेले वातावरण, रयतेच्या पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू आणि बाप्पा घरी जाऊ नये अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना अशी सारी स्थिती मंगळवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या 39 दिवसांच्या गणेश मूर्तीला निरोप देताना असंख्य भाविकांची झाली. हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींच्या गणेश मूर्तीचे भक्तीमय वातावरणात समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा पिरावाडी समुद्र किनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा गणेशउत्सव यावेळी 39 दिवस साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिध्द आहे. या उत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दु.१२ वा. श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १वा. श्रींच्या विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्र किनारी सरकू लागली. रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचराबंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर मूर्ति काही वेळ ठेवण्यात आले तिथे मच्छीमार बांधवांनी दर्शन घेतले. नंतर मिरवणूक परत चालू झाली. सुमारे सहा तास सुरू असलेल्या विसर्जन मिरवणूकीत स्थानिक भाविक , मुंबई,पुणे, कोल्हापुर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते." मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणांनी आचरे गाव दुमदुमून गेला होता.
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूकीत हिंदू बांधवाबरोबर गावातील मुस्लिम ,ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्र किनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने श्री गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्र किनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर "जनसागरही" उसळल्याचे दृश्य दिसत होते.
फोटो -परेश सावंत