महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्कॉनच्या श्रीकृष्ण कथा महोत्सवाचा समारोप

12:00 PM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी दिली भगवंतांच्या विवाहांची माहिती : श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंदातील 58 व्या अध्यायाची सांगता

Advertisement

बेळगाव : श्रीकृष्ण कथा महोत्सवातील पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या तीन विवाहांची माहिती दिली. श्रीकृष्णांनी कौशल देशाचा राजा नग्नजीत यांची कन्या सत्या जिला नग्नाजीती असेही म्हटले जायचे, तिच्याबरोबर विवाह केला. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण कौशल राज्यात गेले त्यावेळी नग्नजीत महाराज सत्या देवीचा विवाह अशा व्यक्तीबरोबर करणार होते जी व्यक्ती त्यांच्या 7 बैलांना (सांड) वश करून नियंत्रण आणतील. ही अट ऐकून तिथे आलेल्या अनेक राजांनी प्रयत्न केले. पण ते सर्व त्या बैलांना वश करायला असमर्थ ठरले.

Advertisement

तेव्हा श्रीकृष्णांनी आपले रूप सात रूपात विस्तारित केले आणि अगदी सहजरीत्या त्या 7 बैलांना वश केले. सत्यादेवीचीही इच्छा भगवंतांबरोबरच विवाह करण्याची होती. त्यामुळे नग्नजीत महाराजांनी मोठ्या आनंदाने सत्याचा विवाह भगवंतांच्या बरोबर केला. त्यावेळी येथे आनंदोत्सव साजरा झाला. हजारो गाई, रथ, हत्ती, सेविका, धनधान्य, मौल्यवान उपाहार देऊन नग्नजीत महाराजांनी आपल्या कन्येची आनंदाने बिदाई केली. अशाप्रकारे भगवंतांची सहावी राणी म्हणून सत्या घरी आली. त्यानंतर शूतकीर्तीची कन्या भद्रा हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यानंतर लक्ष्मणा हिच्याबरोबर आठवा विवाह झाला. अशा प्रकारे एकूण आठ राण्यांशी विवाह करून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना मथूरेत आणले.

कृष्ण कथानकाचा सहाव्या दिवशी समारोप

यावर्षीच्या श्रीकृष्ण कथानकाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या 16100 राण्यांबरोबर झालेल्या विवाहांची कथा सांगितली. भौमासुर म्हणजेच नरकासुर आणि मूर यांचे अनन्वित अत्याचार वाढले होते. भौमासुराने वेगवेगळे ऋषीमुनी, वेगवेगळ्या देवता, वेगवेगळ्या असूर आणि वेगवेगळ्या राजांच्या कन्या जबरदस्तीने आणून बंदीवासात ठेवल्या होत्या. त्यांची संख्या होती 16100. ज्या वेळेला श्रीकृष्णांना हे समजले तेव्हा त्यांनी नरकासुराबरोबर युद्ध केले आणि नरक चतुर्दशीदिवशी त्याचा वध केला. त्या 16100 राण्यांना त्यांनी द्वारकेला पाठवले. त्यांच्यासोबत प्रचंड धनदौलतसुद्धा त्यांना देण्यात आली. द्वारकेला येऊन भगवंतांनी एकाच वेळी एकाच मुहूर्तावर त्या 16100 राण्यांच्या बरोबर विवाह केला. त्यांच्यासोबत त्यांचा सर्व परिवार प्रत्येक ठिकाणी उपस्थित होता.

प्रत्यक्ष रूपाने भगवान श्रीकृष्ण प्रत्येक राजमहालात होते आणि तेही त्यांच्या मूळ रूपात. ही आहे भगवंतांची अद्भुत शक्ती. त्यांचे कार्य तर्क करण्यापलीकडचे आहे. भगवंत त्या प्रत्येक राणीसोबत प्रत्येक महालात अनेक वर्षे राहिले. साधारण मनुष्याप्रमाणेच त्यांनी तेथे व्यवहार केला. एक आदर्श गृहस्थ कसा राहू शकतो हे त्यांनी द्वारकेत राहून दाखवून दिले. अशा प्रकारे भगवंतांच्या 16,108 राण्या झाल्या, असे सांगून भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंदातील 58 व्या अध्यायाची सांगता केली. यावर्षी भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाबाबतची माहिती ऐकून उपस्थित हजारो भक्तगण आनंदित झाले. दरम्यान, सत्यभामा राणीच्या इच्छेखातर त्यांनी स्वर्गातून पारिजात वृक्ष आणला. तो आणण्यासाठी त्यांना इंद्राबरोबर युद्ध करावे लागले. त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला आणि तो पारिजात वृक्ष आणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पत्नीच्या महालासमोर लावला, अशीही माहिती महाराजांनी यावेळी दिली.

इस्कॉन मंदिरात आज-उद्या विविध कार्यक्रम

येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवार व मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी 

सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4.30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यालीला आदी कार्यक्रम होणार आहेत. प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहेत. त्यानंतर रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

श्रील प्रभूपाद व्यासपूजा महोत्सव 27 रोजी 

जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प. पू. श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरात सकाळी 10 वाजता श्रील प्रभुपाद गौरव, 11.30 वाजता अभिषेक, 12.30 वाजता पुष्पांजली व गुऊवंदना आदी कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्तांची भाषणे होतील. तसेच भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्णभक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article