ढगाळ वातावरणामुळे धामणे भागात पुन्हा चिंता
धामणे : दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरणामुळे धामणे, मासगौंडहट्टी, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे (ये.) या भागातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त अवस्थेत दिसत आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे भात पिकाच्या कापणीला उशीर झाला असून, पाऊस जास्त झाल्यामुळे शिवारातील जमिनीत ओलावा जास्त असल्याने भात पिकाच्या कापणीला उशीर झाला. त्याचप्रमाणे भातपीक कापणी संपल्यानंतरसुद्धा शेतजमिनीत ओलावा जास्त होता. त्यामुळे कडधान्य पेरणीला उशीर झाला आहे. आता जमिनीतील ओलावा गेल्या आठवड्यापासून कमी झाल्यामुळे या भागातील शेतकरी मळणी करणे आणि कडधान्य पेरणीच्या कामाला जोर आला होता. तोच पुन्हा गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असले तरी काही शेतकऱ्यांनी कडधान्य पेरणी व भाताच्या मळण्या करण्याचे काम ढगाळ वातावरणाची तमा न बाळगता आपली कामे सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.