कोमुनिदाद दुरुस्ती विधेयक गदारोळात संमत
विरोधकांच्या विरोधाला न जुमानता निर्णय : विरोधकांनी हौदात बसून केला निषेध,आवाजी मतदानाने विधेयक केले संमत
पणजी : कोमुनिदाद जमिनीतील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोधी पक्षीय आमदारांनी विधानसभेत आक्षेप घेतला. विरोधी आमदारांनी कामकाज रोखून धरले आणि त्यांनी सभापती रमेश तवडकरांच्या समोरील हौदात धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. त्यांनी तेथे बैठक मांडली आणि सरकारचा निषेध चालू ठेवल्याने गदारोळ माजला. अर्धा तासभर चाललेल्या या गदारोळातच सरकारने आवाजी मतदानाने विधेयकाला मान्यता दिली. विरोधी आमदारांनी तीनवेळा सभापतींसमोर जाऊन कामकाज अडवले. सभापतींनी एकवेळा पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
पुन्हा कामकाज सुरु केल्यानंतरही विरोधकांनी पुन्हा हौदात येऊन घोषणा दिल्या आणि तिथेच बैठक मारली. रात्री 10 ते 10.30 असा सुमारे अर्धा तास हा गदारोळ चालू होता. त्यानंतर सभापतींनी पुन्हा एकदा पाच मिनिटांसाठी कामकाज थांबवले. महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सदर विधेयक सभागृहात मांडले आणि त्याची एकंदरित व्याप्ती सांगितली. त्यातील विविध कलमे त्यांनी स्पष्ट केली. त्यास विरोधी आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, व्हेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, एल्टॉन डिकॉस्ता, वीरेश बोरकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी आपापल्या भाषणातून जोरदार विरोध दर्शवला.
मतांवर डोळा ठेवून विधेयक
कोमुनिदाद जमिनीची सरकारने लूट चालविली असून हे कोमुनिदाद यंत्रणा संपवण्याचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केला. आगामी विधानसभा निवडणूक आणि मतांवर डोळा ठेवून हे विधेयक घाईघाईने आणल्याची टीका विरोधकांनी केली. व्होट बँक तयार करण्याचा हा डाव आहे. सत्ताधारी भाजपच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकू लागल्यामुळे हा पक्ष घाबरला असून मतांसाठी या विधेयकाचे राजकारण केल्याचे विरोधकांनी नमूद केले.
जमिनी हडप केलेल्यांचे हीत
हे विधेयक गोमंतकीयांच्या हिताचे नाही. त्याचा फायदा जमीन हडप केलेल्यांना होणार असल्याचे विरोधकांनी ठासून सांगितले. ते विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी सूचना विरोधी आमदारांनी केली पण फेटाळण्यात आली. सभापतींनी विरोधी आमदारांना शांत राहाण्याची, जागेवर जाऊन बसण्याची विनंती वारंवार केली. डॉ. सावंत यांनीही तुम्ही बोला, चर्चा करु या, असेही सांगितले पण विरोधकांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यांनी आपली घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे जवळपास अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सभागृहात फक्त गोंधळ गडबड चालू होती. कोण काय बोलतो तेच कळत नव्हते. याच गोंधळात सदर दुरुस्ती विधेयकांसहीत इतर तीन विधेयकेही आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. सभागृहाचे कामकाज स्थगित करेपर्यंत विरोधी आमदारांची घोषणाबाजी, गोंधळ चालूच होता. कामकाज संपल्यानंतर सर्व काही शांत झाले.
कोमुनिदाद जागेतील 80 टक्के घरे गोमंतकीयांची : मुख्यमंत्री
कोमुनिदाद जागेत 80 टक्के गोमंतकीयांची घरे असून गेल्या अनेक वर्षापासून ते तेथे रहातात. त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी हे विधेयक आणले आहे. तेथे राहणारी माणसे सर्वसामान्य आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे आणि काहीजण एकमेकांच्या घरांविरोधात तक्रारी करीत असल्याने कोर्टात जात असल्यामुळे काही घरे पाडण्याची कृती करावी लागली आहे. त्या घरांना आणि त्यातील कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांची घरे कायदेशीर व्हावीत म्हणून हे विधेयक असल्याचा खुलासा डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. घरे पाडली जाण्याची भीती त्या घरांवर होती. ती दूर करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे आहे. त्यांनी कोणाला तरी पैसे देऊन कोमुनिदाद जमिनी घेतल्या आहेत. याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले.