माळी गल्लीतील ‘ते’ काम तातडीने पूर्ण करा
बेळगाव : माळी गल्लीत स्थानिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यापूर्वीच ड्रेनेज लाईन घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. सदर काम अर्धवटस्थितीत असल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ माळी गल्ली यांच्यातर्फे मंडप घालून श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही अर्धवट काम पूर्ण करण्यात न आल्याने बुधवारी गणेशोत्सव मंडळ व रहिवाशांनी आंदोलन केले. त्यामुळे नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी संपर्क साधून तातडीने काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.
महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी खोदकाम केले जात आहे. मात्र तातडीने काम पूर्ण करण्याऐवजी अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत काम सोडून देण्यात आले आहे. अर्धवट कामाचा फटका स्थानिक रहिवाशांना सहन करण्याची वेळ आली आहे. काही दिवसापूर्वी माळी गल्ली आणि तेंगीनकेरा गल्लीत ड्रेनेज पाईपलाईन घालण्यासाठी खोदकाम हाती घेण्यात आले. मात्र त्याला विरोध झाल्याने काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे.
काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन
गणेशोत्सव तोंडावर आला असतानादेखील तेथील माती हटविण्यासह चर बुजविण्यात आलेली नाही. त्याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मंडप उभारला जातो. पण मंडप उभारण्यासाठी अर्धवट कामामुळे अडचण निर्माण झाली आहे. याबाबत मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी बुधवारी आंदोलन करून मनपाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी फोनवर संपर्क साधत तातडीने अर्धवट स्थितीतील काम पूर्ण करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.