देपसांग, डेमचोकमधून सैन्य माघार पूर्ण
भारत-चीनकडून कराराची पूर्तता : तणाव कमी होण्यास मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाख सेक्टरच्या देपसांग आणि डेमचोक भागांमध्ये सैनिकांच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. भारत आणि चीनचे सैन्य परस्परांकडून तेथील स्वत:चे तळ रिकामी करणे आणि तात्पुरत्या संरचना हटविण्याची पुष्टी करत आहे. 21 ऑक्टोबर रोजी भारताने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासाठी चीनसोबत झालेल्या एका कराराची घोषणा केली होती. यामुळे चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान सैनिकांच्या माघारीची प्रक्रिया देपसांग आणि डेमचोकमध्ये पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत दोन्ही बाजूंकडून मूलभूत संरचना हटविणे आणि सैनिकांना माघारी आणणे सामील असल्याचे संरक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही क्षेत्रांमध्ये डिसएंगेजमेंटला अंतिम स्वरुप देणे हे भारतीय सैन्याचे लक्ष्य आहे, यानंतर समन्वित गस्त सुरू होणार आहे. दीर्घकाळापासून चालत आलेला हा वाद सोडविण्याच्या दिशेने भारत काम करत आहे, क्षेत्रात चिनी घुसखोरीपूर्वीची म्हणजेच एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती निर्माण करण्यास यामुळे मदत होणार आहे. म्हणजेच भारतीय सैन्य आता एप्रिल 2020 च्या पूर्वीप्रमाणेच या क्षेत्रात गस्त घालू शकणार आहे.
प्रक्रिया पुढे जातेय : चीन
दोन्ही देशांचे सैनिक सीमा मुद्द्यांवर झालेल्या कराराच्या अनुरुप प्रासंगिक कार्य करत आहेत. हे काम सुरळीतपणे पुढे जात असल्याचे चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
ग्राउंड कमांडर्सची प्रतिदिन बैठक
दोन्ही देशांदरम्यान कुटनीतिक संबंध दृढ करण्यासाठी भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता नियमित स्वरुपात ग्राउंड कमांडर्सची बैठक होत राहणार आहे. गस्त घालत असताना दोन्ही देशांचे सैन्य परस्परांना कळविणार आहे. शेड किंवा तंबू तसेच सैन्याच्या सर्व तात्पुरत्या संरचनांना हटविण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याने याची पडताळणी केली आहे.