स्मार्ट सिटी योजनेंतर्गतची कामे वेळीच पूर्ण करा
खासदार जगदीश शेट्टर यांची विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना
बेळगाव : शहरातील रस्त्यांची वाताहत झाली असून, रस्ते दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत. त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेबाबत जबाबदारीने कामे करावीत, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली. बेळगाव स्मार्ट सिटी मिशन योजना व सौदत्ती रेणुकादेवी देवस्थानमध्ये केंद्र सरकारच्या एसएएससीआय या विशेष योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांबाबत माहिती घेण्यासाठी खासदार शेट्टर यांनी मंगळवारी (दि. 18) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही उपयुक्त सूचना केल्या.
990 कोटी रु. योजनेच्या अनुदानापैकी 931 कोटी रकमेतून 104 कामे पूर्ण झालेली आहेत. अद्याप चार कामे बाकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टिळकवाडीतील कला मंदिरच्या जागेत उभारण्यात आलेले गाळे अद्याप वितरण करण्यात आलेले नाहीत. गाळ्यांचे वितरण त्वरित करण्याची सूचना खासदार शेट्टर यांनी केली. शहरातील नूतन बसस्थानकाचे उद्घाटन झाले आहे. मात्र कॅन्टेंन्मेट मालकीची ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आलेली नाही. हस्तांतराची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतर्गंत शहरातील सात तलावांचे पुनरुज्जीवन व उद्यानांची सुधारणा 24 कोटी रु. खर्चातून करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सौदत्ती येथील रेणुका देवस्थानमध्ये मूलभूत सुविधा पूरवून सर्वांगीण विकासासाठी 118 कोटी रु. अनुदानातून कामे करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर खासदार शेट्टर यांनी पर्यटन खात्याच्या सहसचिवांशी दूरवाणीवरुन संपर्क साधून कामे हाती घेण्यासाठी निविदा मागविण्यास त्वरित मंजूरी द्यावी अशी सूचना केली. बैठकीला महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटी मिशनच्या व्यवस्थपकीय संचालक शुभा बी., रेणुका देवस्थान विकास प्राधिकारणचे सचिव अशोक दुडगुंटी, सुक्षेत्र रेणुका पर्यटन विकास मंडळाच्या आयुक्त गीता कौलगी, बेळगाव विभाग पर्यटन खाते उपसंचालक बडिगेर आदी उपस्थित होते.