धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण करा
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : धारवाड-बेळगाव व्हाया कित्तूर रेल्वेमार्ग तांत्रिक कारणास्तव रखडला आहे. परंतु या रेल्वेमार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असल्याने वेगाने या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करावे. त्याचबरोबर बागलकोट-कुडची या रेल्वेमार्गाबाबतही गतीने कामे पूर्ण करावीत, अशी सूचना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. नैर्त्रुत्य रेल्वेच्या रेलसौध येथे झालेल्या बैठकीमध्ये मंत्री जोशी बोलत होते. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथुर यांनी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. या बैठकीमध्ये आमदार महेश टेंगिनकाई, महापौर ज्योती पाटील, आयुक्त रुद्रेश घाळी, नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना, साहाय्यक आयुक्त विजयकुमार यांच्यासह केआयएडीबी व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हुबळी-अंकोला या नव्या रेल्वेमार्गासाठी 14 हजार कोटींचा डीपीआर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर हुबळी रेल्वेस्थानकाचे 397 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. कोणत्याही अडचणी असल्यास अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला त्या कळवाव्यात. परंतु, लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.