तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिजचे काम तातडीने पूर्ण करा
खासदार जगदीश शेट्टर यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिजचे काम मागील दोन वर्षांपासून बंद आहे. राज्य सरकारकडून पुरेसा निधी न आल्याने काम थांबविण्यात आले आहे. परंतु यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने मंगळवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वेगेट परिसराची पाहणी केली. अर्धवट स्थितीत असलेल्या कामाबाबत तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिजवर पावसाळ्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खड्ड्यांमध्ये काँक्रिट घालण्यात आले. परंतु पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे हे खड्डे लवकर भरण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच उर्वरित ओव्हरब्रिजचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली.
पहिले, दुसरे रेल्वेगेटही होणार
टिळकवाडी येथील रहदारी वाढल्याने पहिले व दुसरे रेल्वेगेट येथेही ओव्हरब्रिज होणार आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिसराचे मोजमाप करण्यात आले आहे. मंगळवारी हुबळी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदारांनी पाहणी केली. शहरात होणारी गर्दी पाहता या दोन्ही ठिकाणी लवकरच ओव्हरब्रिजचे बांधकाम केले जाईल, असे खासदारांनी सांगितले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह नगरसेवक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.