मालमत्ता सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करा
जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची ता. पं. अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : दुष्काळ आणि निवडणूक या दोन्ही जबाबदाऱ्या योग्यप्रकारे हाताळून स्वीप समितीच्या उपक्रमांतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यात सहभाग असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच आठवड्याभरात मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण करा, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये तालुका पंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला. ग्राम पंचायत व्याप्तीतील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू असून या अभियानांतर्गत ते काम आठवडाभरात पूर्ण करण्यात यावे. सर्वेक्षणास विलंब केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मालमत्ता सर्वेक्षणाची माहिती पीटू अहवालामध्ये अपलोड करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सकाल योजनेंतर्गत दाखल केलेले अर्ज येत्या दोन दिवसांत निकालात काढण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये, याप्रकारे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, पीडीआय प्रक्रिया चार दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी, तसेच रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या मुलांसाठी सर्व प्रकारचा सर्व्हे पूर्ण करून त्वरित अपडेट करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेंतर्गत नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तालुका पंचायतींना दिलेल्या उद्दिष्टानुसार प्रगती साधण्यात यावी. 2023-24 वर्षातील प्रत्येक ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील कामे पूर्ण करण्यात यावीत. प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ग्राम पंचायतीने कामगारांना सोयीचे ठरेल यादृष्टिने सकाळच्यावेळी कामे द्यावीत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रगतिपथावर असणाऱ्या समुदाय स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्यात यावीत. एसडब्ल्यूएमअंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये दैनंदिन काम प्रगतीवर रहावे, वैयक्तिक स्वच्छतागृहांची प्रगती साधण्यावरही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी जि. पं. उपकार्यदर्शी रेखा डोळ्ळीन्नावर, बसवराज अडवीमठ, योजना संचालक डॉ. एम. कृष्णराजू, मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, ता. पं. चे कार्यकारी अधिकारी, साहाय्यक संचालक, पंचायतराज व जि. पं कर्मचारी उपस्थित होते.