चार्जिंग स्टेशनचे काम तत्काळ पूर्ण करा
कोल्हापूर :
महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी लागणारा निधी महायुतीच्या माध्यमातून देऊ, यासाठी विविध कामांचे प्रस्ताव महापालिकेने द्यावे त्यास निधीची कमतरता पडू देणार नाही. केंद्र शासनाकडून 100 ई बस मंजूर झाल्या असून, चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन लवकरच या बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, आणि ड्रेनेजच्या विविध समस्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांचा आढावा शुक्रवारी खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेत घेतला. केंद्र शासनाकडून 100 ई बसेस मंजूर आहेत. चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर, या बसेस केएमटीच्या ताफ्यात येणार आहेत. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. याबाबत खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दिल्लीत 500 ई-बसेस पडून आहेत. त्या लवकर कोल्हापुरात दाखल व्हाव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कुलगुरू आणि प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून, तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा. त्यानंतर तो 8 दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला पाहीजे. 100 कोटी अनुदानातून मंजूर रस्ते कधी पूर्ण होणार, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. मार्च अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील, असे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीतून जाणाऱ्या डीपी रस्त्याचे काम 2016पासून प्रलंबित आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात आली हे गृहीत धरून, महापालिकेने बांधकाम परवानगी दिली असे सांगत पाणीपुरवठ्याचा घोळही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी येत नाही, अशी तक्रार प्रा. जयंत पाटील यांनी केली. तर वारंवार पाणी पुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. याबाबत जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी खुलासा करत कोल्हापुरात शहरात बारा टाक्यांपैकी नवीन अकरा टाक्यांचे काम पूर्ण आहे. पाच टाक्यांची चाचणी झाली आहे.
त्यापैकी तीन टाक्या लवकरच सुरू होतील, असे सांगितले. अमृत 1 योजनेतून ड्रेनेज आणि शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. अमृत 2 मधून उपनगरात 243 किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. जुनी ड्रेनेज योजना कालबाह्या झाल्याने, ती बदलणे गरजेचे असल्याचे आर. के. पाटील यांनी सांगितले. त्यावर ड्रेनेज बाबतचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू, असे खासदार महाडिक यांनी नमुद केले. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची माहिती त्यांनी घेतली. दरम्यान जादा बेडचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. आरोग्य, बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी ठोक मानधनावर भरती करता येईल का, अशी विचारणा प्रा. जयंत पाटील यांनी केली. जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेला शाळा आणि दवाखान्यांसाठी निधी मिळतो. तसाच निधी महापालिकेलाही मिळावा, अशी अपेक्षा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली. निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले. शहरातील मैदाने विकसित करण्याबरोबर छोट्या छोट्या जागा विकसित कराव्यात. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठवावा, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोटीतिर्थ तलावाच्या विकासासाठीचा प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी केल्या. शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा लागेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल पासून शिवाजी पुलापर्यंत तसेच त्याला जोडणारे 7 उड्डाण पुल उभारण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी 2014 ते 2019 या कालावधीत प्रयत्न केले आहेत. आता त्याला गती येईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगररचना विभागाचे रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, रूपाराणी निकम, किरण नकाते, माधुरी नकाते, मनिषा कुंभार, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे उपस्थित होते.