हिंडलगा-बाची रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा
रस्ता उखडून टाकून खडी टाकल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार : वाहनधारकांना दुखापती
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते बाची या पट्ट्यातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून संपूर्ण रस्ता सध्या खणलेला आहे. उचगाव फाटा ते बाची या पट्ट्यात रस्त्यावर खडी पसरविण्यात आली आहे. खडी टाकण्यात आलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे. या खडी टाकलेल्या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवणे मुश्किल झाले असून अनेक दुचाकी वाहने घसरून वाहनचालक जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवासीवर्गाने केली आहे. हिंडलगा ते बाची या पट्ट्यातील रस्त्याची दुरुस्तीचे काम जोरदार सुरू आहे.
सदर रस्ता पूर्णपणे खणला असून रस्त्यावरील डांबरीकरण रस्त्याच्या दुतर्फा काढून फेकण्यात आले आहे. तसेच या रस्त्यावरती नवीन खडी टाकण्यात आली आहे. सदर खडीवरती अद्याप रोलिंग न केल्याने या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. अनेक वाहने या रस्त्यावर टाकलेल्या खडीतून चालवताना घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. आणि वाहनचालकांना दुखापती होत आहेत. यासाठी ठेकेदाराने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. बेळगाव-वेंगुर्ले महामार्गावर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. ट्रक व मोठ्या वाहनांच्या टायरच्या बाजूने वेगाने दोन्ही बाजूला दगड फेकले जातात. असे दगड हे अनेकांना बसून काही जण किरकोळ जखमाही होत आहेत. यासाठी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.