स्मार्ट वीज मीटर विरोधात तक्रारी जेमतेम एक टक्काच!
चिपळूण :
स्मार्ट वीज मीटर विरोधात सर्वत्र रान उठले असून राजकीय पक्षाची मंडळीही दिवसेंदिवस महावितरण कार्यालयावर धडका मारत आहेत. मात्र विरोधाचा सूर अधिक असला तरी प्रत्यक्षात स्मार्ट मीटरबाबत महावितरणकडे तक्रारी जेमतेम एक टक्काच असल्याचे पुढे आले आहे. या तक्रारी वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे निराकारण झाले असून आजपर्यंत एकही मीटर बदलण्यात आलेला नाही. चिपळूण व गुहागर तालुक्यात आतापर्यंत 33 हजार स्मार्ट मीटर बसवून झाल्याची माहितीही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर येणारे वीजबिल नेहमीपेक्षा अधिक असल्याच्या तक्रारी ठिकठिकाणाहून येऊ लागल्या. त्यानंतर त्या तक्रारीनुसार राजकीय मंडळांनीही या मीटर विरोधात दंड धोपटण्यास सुरुवात केली. गेले 15 दिवस तर चिपळूण महावितरण कंपनीत सातत्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन या स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध केला आहे. सोमवारीही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्यास तात्पुरत्या स्वरुपाची स्थगिती देत असल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता धनंजय भांबरे यांनी दिले.
दरम्यान, स्मार्ट मीटर विरोधाच्या पार्श्वभूमीवर येथील महावितरणच्या कार्यालयातून मिळालेली माहिती आश्चर्यकारक आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यात घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वर्गातील सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. त्यातील 33 हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. यातील जेमतेम 1 टक्काच तक्रारी या कार्यालयाकडे आल्या होत्या. यामध्ये मीटर वेगाने फिरत असल्याने वीजबिल अधिक असल्याची तक्रार प्रामुख्याने होत होती. मात्र महावितरणने ग्राहकांसमोरच मीटर तपासल्यानंतर मीटरमध्ये कोणताही दोष असल्याचे आढळून आलेले नाही. तर काही ठिकाणी जे अधिकचे बील आले होते, ते मीटर पंचिंग करतानाच झालेली चूक होती. त्यामुळे ते मान्य करुन तशा बिलांची दुरुस्ती करुन देण्यात आली. त्यामुळे बसवण्यात आलेल्या या 33 हजार मीटरमध्ये एकही मीटर एखाद्या दोषामुळे बदलून देण्यात आलेला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.