Satara : सासपडेप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार
शिवसेना उबाठा पक्षाचे रुपाली चाकणकर, तुषार दोशी यांना निवेदन
सातारा : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सासपडे येथील १३ वर्षाच्या निष्पाप मुलीला न्याय मिळण्याबाबत सर्व महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना अमृता पाटील, सुशीला जाधव, कल्पना गिड्डे, कांताबाई पवार, नंदा आवळे, सुरेखा चव्हाण, दिव्या पवार, पायल पाटील, ऐश्वर्या पाटील, लक्ष्मी लोहार, प्रणव सावंत, बाळासाहेब शिंदे, सागर धोत्रे, राहुल पवार, संतोष चव्हाण, सुनील पवार, श्रीकांत पवार, रवींद्र भणगे, आकाश धोंडे, शैलेश बोडके, आशुतोष पारंगे, बबन धनावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला सातारा जिल्ह्याची ओळख आहे. आपल्या जिल्ह्यात सासपडे या गावी मन हेलावून टाकणारी, समाजाला काळिमा फासणारी अत्यंत निंदनीय घटना घडली. सातारा पोलीस प्रशासनावर नितांत विश्वास सातारकर आणि सर्व शिवसैनिकांचा आहे. आज अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीवर असा प्रसंग ओढवणे अत्यंत निंदनीय आहे. मनाला वेदना देणारे आहे.
ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेतील नराधम राहुल यादव यास कठोरातील कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी. अशा गुन्ह्यासंदर्भात ठोस व तत्काळ पावले उचलावीत, अन्यथा महिला आघाडी आणि जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मिळून आम्ही शिवसेना स्टाईलने मोठे आंदोलन उभा करू. तसेच महाराष्ट्रभर महिला आघाडी आणि शिवसैनिक आंदोलन करतील. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा देण्यात आला.