महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माय-लेकीच्या मृत्यूप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

12:10 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवानीचा भाऊ शुभम सिंह चौहान याने व्यक्त केला घातपाताचा संशय

Advertisement

मडगाव : नवेवाडे-वास्को येथे स्वयंपाक घरात गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाल्याने गरोदर महिलेसह तिच्या आईचा अंत झाला होता. या घटनेने संपूर्ण गोवा हादरला होता. ही गॅसगळती मुद्दामहून केली होती का? असा संशय निर्माण होत आहे. या घटनेत बळी गेलेल्या शिवानी राजावत हिचा भाऊ शुभम सिंह चौहान याने वास्कोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत आपल्याला ही घटना अपघात असे वाटत नाही, असे नमूद करुन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशमध्ये पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या शुभम सिंह चौहान यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत अनेक संशयास्पद मुद्दे उपस्थित केले आहेत. ते आपल्या तक्रारीत म्हणतात की, आपली छोटी बहीण शिवानी हिचा विवाह अनुराग राजावत (वय 26) याच्याशी 5 फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही आमच्या कुवतीनुसार 12 लाख ऊपये व आवश्यक साहित्य हुंडा म्हणून दिले होते. लग्नानंतर अवघ्या 4-5 महिन्यातच शिवानी हिने आपली सासू हुंडा कमी दिल्याचे सांगून छळ करीत असल्याची कल्पना आपल्याला व तसेच आपली आई जयदेवी चौहान हिला दिली होती.

Advertisement

पती घेत होता सासूची बाजू

सासूकडून होत असलेल्या छळाची कल्पना तिने आपला पती अनुराग राजावत यालाही दिली होती. मात्र, त्याने कधीच आपल्या बहिणीचा मानसिक तणाव समजून घेतला नाही. उलट तो स्वत:च्या आईची बाजू घेत राहिला. गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वीच शिवानी गोव्यात आली होती. गोव्यात आल्यानंतरही ती सुखी-समाधानी नव्हती. तिने आपल्याला तसेच आईला सांगितले होते की, अनुराग हा त्याच्या आईच्या सांगण्याप्रमाणेच वागत होता.

तरुणीमुळे उडत होते दोघांत खटके

आपली बहीण गरोदर असताना देखील घरातील सर्व कामे ती एकटीच करायची. तसेच अनुराग हा एका मुलीसोबत वारंवार संवाद साधत होता. या मुलीमुळेच त्यांच्यात खटके उडत होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

शिवानीला परत घरी नेण्यासाठी वाद

गेल्या एक महिन्यापासून आपल्या बहिणीला काम करण्यासाठी समस्या निर्माण होऊ लागल्याने, तिने आईला गोव्यात बोलावून घेतले होते. आपली आई 3 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्यात आली. तेव्हापासून अनुराग हा शिवानीला घरी घेऊन जाण्यासाठी वाद घालत होता. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी आपली शिवानी व आई जयदेवी चौहान यांचा फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडून मृत्यू झाला. आपल्याला या मृत्यू प्रकरणात संशय वाटत आहे, असे शुभमसिंह चौहान यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला वाटत नाही की हा अपघात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास यंत्रणेने सखोल तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे नेण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे.

न्यायवैद्यक पथकाकडून तपासणी...

दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती मिळविण्यासाठी न्यायवैद्यक पथकाने नवेवाडे-वास्को येथील फ्लॅटवर भेट देऊन तपासणी केली असता, त्यात गॅस सिलिंडर सुरक्षित होता तसेच किचनमधील ओटा तसेच इतर सर्व सामान सुरक्षित असल्याचे त्यांना आढळून आले. गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात केवळ खिडक्यांची तावदाने तसेच फ्रेम तुटून पडल्याचे आढळून आले.

गॅस गळती झाली की केली गेली..?

सिलिंडरमधून गॅस गळती झाली की, मुद्दामहून केली गेली असा सवालही उपस्थित झालेला आहे. घटनेच्या दिवशी मयत शिवानी हिची आई जयदेवी ही आंघोळ करून दूध आणण्यासाठी फ्लॅटमधून बाहेर गेली होती. आई आंघोळ करून गेल्यानंतर शिवानी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. याच दरम्यान, ही गॅसगळती झाली की, केली गेली असा सवाल उपस्थित झालेला आहे. शिवानीने आंघोळीला जाताना कंबरेभोवती टॉवेल गुंडाळला होता तशाच अवस्थेत तिचा मृतदेह चिकित्सेसाठी हॉस्पिटलमध्ये आणला गेला होता.

अनुराग त्यावेळी कुठे होता...

शिवानीचा पती अनुराग हा घटनेच्या दिवशी नेमका कुठे होता असा सवालही उपस्थित झालेला आहे. तो नौदलात कर्मचारी असून त्याने गावी जाण्यासाठी या घटनेच्या दोन दिवस अगोदर रजा टाकली होती. त्यामुळे तो ड्युटीवर नव्हता हे स्पष्ट होत आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तो रजेवर असल्याची माहिती तपासाच्या दरम्यान दिली आहे. संध्याकाळी 3 वाजता गावी जाण्यासाठी ट्रेन असल्याने फळे खरेदी करण्यासाठी आपण बाजारात गेलो होतो अशी माहिती अनुराग याने तपासाच्या दरम्यान दिली आहे. न्यायवैद्यक पथकाला त्याच्या विधानात दरवेळी बदल होत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या हालचालांचा तपास यंत्रणेने सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे मतही न्यायवैद्यक पथकाने मांडले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article