विरोधी गटाविषयी नड्डा यांच्याकडे तक्रार
भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला लगाम घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, पक्षातील अंतर्गत समस्यांवर कसा तोडगा काढावा याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्य भाजप नेत्यांशी चर्चा केली. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या गटातील नेत्यांनी विरोधी गटातील नेत्यांविषयी तक्रार केल्याचे समजते. राज्य भाजपमध्ये आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि बी. वाय. विजयेंद्र यांच्यातील गटबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात नड्डा यांनी बेंगळूर विमानतळावरच भाजप नेत्यांची बैठक घेतली. बेंगळूरमधील निम्हान्स संस्थेतील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्य भाजपाध्यक्ष गुरुवारी रात्री बेंगळुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी अंतर्गत राजकारणाला लगाम घालून सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काय करावे, पक्ष स्तरावर कोणते निर्णय घ्यावेत, कोणत्या रितीने पक्षातील वादावर तोडगा काढावा, यावर विस्तृत चर्चा केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व इतर नेत्यांनी जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करताना वक्फ मालमत्तेसंबंधी स्वतंत्र आंदोलन करत असलेल्या राज्य भाजपमधील गटाविरोधात तक्रार केली. स्वतंत्रपणे आंदोलन करून पक्षसंघटनेला हा गट अडथळा आणत आहेत. त्यांना वेळीच चाप लावाला, अशी विनंती केल्याचे समजते. त्यावर प्रतिक्रिया देताना नड्डा यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींची मला संपूर्ण माहिती आहे. आधी पक्ष महत्त्वाचा. पक्षाचे हित विचारात घेऊन समस्या सोडवेन, असे आश्वासन दिले. दरम्यान, बेंगळूरमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी सकाळी देखील राज्य भाजपच्या काही नेत्यांनी स्वतंत्रपणे भेट घेऊन पक्षातील अंतर्गत राजकारणाची माहिती दिली. पक्षातील गटबाजी पक्षसंघटनेला मारक ठरत आहे. पक्षाच्या वर्चस्वाला बाधक ठरत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी विनंती केली. नेत्यांच्या तक्रारी ऐकून नड्डा यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले.
विरोधी गटाच्या नेत्यांनी भेट घेणे टाळले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा राज्य दौऱ्यावर आले असताना देखील त्यांची आमदार यत्नाळ यांच्या गटातील कोणत्याही नेत्याने भेट घेतली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. नड्डा यांची पक्षातील प्रमुख नेत्यांनी भेट घेतली तरी त्यांची आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद, कुमार बंगारप्पा यांनी भेट घेतली नाही.