For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी फलकांवरील कारवाईसंदर्भात राष्ट्रपती-गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार

06:38 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मराठी फलकांवरील कारवाईसंदर्भात राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार
Advertisement

युवा समितीच्या बैठकीत निर्णय : सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावमध्ये जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि कन्नड संघटनांकडून वेळोवेळी मराठी भाषिकांना आणि फलकांना लक्ष्य बनविले जात आहे. मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे रक्षण करावे यासंदर्भात केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे युवा समितीच्यावतीने कित्येकवेळा तक्रार दाखल करण्यात आली. त्याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडून सूचना देऊनसुद्धा कोणतीच दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे याची तक्रार राष्ट्रपती आणि गृहमंत्रालयाकडे करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शनिवारी आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सांगितले.

Advertisement

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी युवा समिती कार्यालयात घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. येत्या 6 जानेवारी 2026 रोजी युवा समितीच्यावतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय झाला. यावर्षी सदर स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन खानापूर रोड येथे संपन्न होणार असून प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय विभागातून चार गटात स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला जवळपास 3000 विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. सीमाभागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धेच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने युवा समितीच्यावतीने ही स्पर्धा सुरू करण्यात आली. यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. तेव्हा स्पर्धा उत्साहात आणि नियोजनबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामेळाव्याला तोंडी परवानगी देऊनसुद्धा आडकाठी आणणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आणि अटकेतसुद्धा मराठीबाणा दाखवत महामेळावा यशस्वी केला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, पदाधिकारी विनायक कावळे, सूरज कुडूचकर, राकेश सावंत, प्रतीक पाटील, अश्वजीत चौधरी, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, कल्याण कुंदे, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, रितेश पावले उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.