कवळे मठाच्या स्वामींविरोधात जमीन विक्रीप्रकरणी तक्रार
बनावट कागदपत्राद्वारे जमीन विकल्याचा दावा : विश्वस्त डॉ. रामाणी व जॅक यांची तक्रार
फोंडा : बनावट कागदपत्रे तयार करून मठाशी संबंधित जमीन परस्पर विकल्या प्रकरणी कवळे गौडपादाचार्य मठाचे मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीजींच्या विरोधात फोंडा पोलिसस्थानकात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. स्वामीजींसह अॅटर्नी अवधूत शिवराम काकोडकर व नोटरी अॅड. मनोहर आडपईकर यांच्या विरोधात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौडपादाचार्य मठाशी निगडीत कवळे मठ गौड स्मार्थ कम्युनिटी ट्रस्टचे मुंबई स्थित विश्वस्त भूषण जॅक व डॉ. पी. एस. रामाणी यांनी फोंडा पोलिसात ही तक्रार नोंदविली होती. या तक्रारीनुसार शिवानंद सरस्वती स्वामीजींनी मठाचे पूर्व स्वामी श्रीमद् सच्चिदानंद सरस्वती स्वामीजी हे स्वत: आपणच असल्याचे भासवून मठाच्या मालमत्तेसंबंधी अधिकाराची बनावट कागदपत्रे तयार कऊन अवधूत काकोडकर यांना पॉवर ऑफ अॅटर्नी दिलेली आहे. या कागदपत्रांचा वापर करून वेळप कवळे येथे असलेल्या मठाच्या मालकीची जमीन महर्षी अध्यात्म विश्व विद्यालयाला परस्पर विकण्यात आली आहे.
प्रत्यक्षात जमीन व अन्य मालमत्तेसंबंधी खरेदी विक्री व्यवहार करण्याचा अधिकार ट्रस्टला आहे. स्वामीजी स्वत: मठाधीपती असले तरी ते ट्रस्टी नाहीत, असे या तक्रारीत म्हटले आहे. काकोडकर यांना पॉवर ऑफ अॅटर्नी बहाल करण्यासाठी हयात नसलेले पूर्व स्वामी श्रीमद् सच्चिदानंद सरस्वती यांच्या नावाचा दुऊपयोग करण्यात आलेला आहे. संबंधीत कागदपत्रे बनविण्यासाठी श्रीमद सच्चिदानंद स्वामी हे स्वत: आपणच असल्याचे भासविण्यासाठी तसे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. वेळप कवळे येथील जमिनीसह मठाच्या अन्य राज्यातील बऱ्याच जमिनी ट्रस्टला अंधारात ठेवून काकोडकर यांच्या नावे विक्री व्यवहार केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
फोंडा न्यायालयात या कागदपत्रासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करताना पूर्व स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांचे निर्वाण 3 एप्रिल 2017 मध्ये झाल्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात स्वामीजींचे निर्वाण 3 एप्रिल 2005 साली झालेले आहे. कायदेशीर कागदपत्रे बनविण्याचा व्यवहार नोटरी अॅङ मनोहर आडपईकर यांच्यामार्फत झाल्याने त्यांचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक, मालमत्तेसंबंधी बनावट कागदपत्रे तयार करणे व प्रतिज्ञापत्रातून चुकीची माहिती देणे अशा विविध कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कागदोपत्री चुकीमुळे गोंधळ : आडपईकर
दरम्यान अॅड. मनोहर आडपईकर यांनी जमीन विक्रीव्यवहाराच्या कागदोपत्रातील चुकीमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी आपला अॅटर्नी अवधूत काकोडकर यांच्यामार्फत हा व्यवहार केला होता. सेलडीडच्या कागदपत्रावर श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी ऐवजी पूर्व स्वामी श्रीमद् सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांच्या नावाचा उल्लेख राहिला होता. ही चूक निदर्शनास आल्यानंतर शिवानंद सरस्वती स्वामीजींनी न्यायालयामार्फत हा जमीन विक्री व्यवहार रद्द कऊन पैसेही परत केले. हा प्रकार 20 मार्च 2018 मध्ये घडला होता. तब्बल सहा वर्षांनी पुन्हा तो उकऊन काढण्यात आलेला आहे. मठावर नूतन समितीसाठी निवडणूक होणार असून हे प्रकरण पुढे कऊन त्याचा लाभ उठविण्याचा उद्देश असावा, असे आडपईकर म्हणाले.