Competitive Exam : स्पर्धा परीक्षेतील मितवा : सारथी!
300 पानी भली मोठी वही घेऊन आपण खरडायचा कार्यक्रम पद्धतीशीर सुरु केला
By : डॉ. संकल्प देशमुख
पुणे : पुण्यात UPSC च्या तयारीसाठी आलो तेव्हाचा एक किस्सा आठवतो. नुकताच अभ्यास सुरु केला होता. द हिंदू या वर्तमानपत्राची 3-3 तास पारायणे सुरु झाली होती. ऐकलं होत खूप जणांकडून फक्त की ‘द हिंदू’ वाचायचा असतो आणि त्याची टिपण काढायची असतात.
एक 300 पानी भली मोठी वही घेऊन आपण खरडायचा कार्यक्रम पद्धतीशीर सुरु केला होता. एका महिन्यात ती वही भरली. स्वारी खुश. म्हणलं आता ही वही घेऊन थेट आपल्या मास्तरकडे जायचं. मास्तर आपली वही पाहून प्रचंड खूष होणार. बक्षीस नाही तर नाही शाबासकी तरी देईल.
अगदीच Well Done दहा दहा जरी म्हणलं मास्तरने तर क्लासच्या बाहेरच असणाऱ्या फिश करी हॉटेलात जाऊन सुरमई बेत मारायचा, प्लॅन होता मस्त. पण झाले भलतेच. मास्तरची वेळ घेऊन केबिनपर्यंत मजल मारली खरी. पण वही पाहून मास्तरच्या चेहऱ्यावर स्मित सोडा पण कपाळावर फक्त आठ्या दिसू लागल्या आणि त्या पण प्रत्येक पानागणिक वाढू लागल्या.
300 पान आता मला 3 एक हजार वाटू लागली. मास्तरने उद्गारलेले पहिले शब्द होते काय छापखाना सुरु केलास का? मी गार पडलो पण कानातून गरम हवा बाहेर पडल्याचं जाणवत होत. मास्तरच पुढचं वाक्य होत असली गाढव मेहनत करून काय करशील?. लै लागलं मनाला, मास्तरचा राग सुद्धा आला जरा. सुरमई तर गेली पण वडापाव खाऊन रूमवर जायची वेळ आली.
आज मागे वळून पाहतो तेव्हा कळत की आपण आज इतरांचे मास्तर झालोय, तेव्हा आपल्याला पण आपल्या विद्यार्थ्याला कधी कधी दुखवायला लागतं. या दुखवण्यामागे साधं कारण असतं आपल्या विद्यार्थ्याला दह ऑन ट्रॅक ठेवणं.
स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रवासातील एक कळीचा प्रश्न म्हणजे सर मी क्लास केला पाहिजे का? पास होण्यासाठी तुम्हाला जे लागेल ते कष्ट केलं पाहिजे आणि लागेल ती मदत मिळवली पाहिजे. क्लास न करता देखील आपण स्पर्धा परीक्षेत भरघोस यश मिळवू शकतो, कोणत्याही क्लासला न जाता झालेली कित्येक उदाहरणे दरवर्षीच्या निकालात आपल्याला पाहायला मिळतील.
क्लासेस मधील शिक्षणाचे commercialisation आणि त्यातून विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता, गुणवत्तापूर्ण, अनुभवी मार्गदर्शकांचा अभाव, भरमसाठ फीस आणि त्यातून पडणारा आर्थिक ताण याबाबींमुळे स्पर्धा परीक्षार्थींच्या मनात क्लासेसबद्दल साधारणपणे नकारात्मक भावना असते.
त्यातच सेल्फ स्टडी पद्धत विकसित करण्यावर विश्वास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि बऱ्याचशा बाबी आजकाल यू ट्युब आणि एकूणच इंटरनेट वरती ओपन सोर्समध्ये उपलब्ध देखील आहेत. पण दरवर्षीच्या निकालाचे विश्लेषण केल्यास बरेचसे विद्यार्थी विविध क्लासेसचे विविध टप्प्यातील मार्गदर्शन घेऊन पुढे आलेले दिसून येतात.
यावर्षी UPSC मध्ये भारतात पहिला रँक आलेल्या शक्ती दुबे मॅडम यांनी देखील योग्य त्या बाबीसाठी योग्य ठिकाणी मार्गदर्शन मिळवलेले दिसून येते. क्लासेसचा एक महत्वाचा फायदा म्हणजे स्पर्धात्मकता. इतरांच्या तुलनेत आपण किती पाण्यात आहोत, याचा अंदाज क्लासमधील चर्चासत्र, टेस्ट सिरीज यातून कायम घेऊ शकतो.
क्लासेस मधील positive peer pressure मुळे आपण कायम धडपडत राहतो. दुसरी बाब म्हणजे क्लासेस मधून संकल्पनात्मक स्पष्टीकरण, अभ्यासक्रमाची आणि प्रश्नांची योग्य उकल, लिखाणाबद्दल मिळणारे फीडबॅक, महत्वाच्या अपडेटेड नोट्स यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास मुरायला आणि त्यांच्या वेळेची बचत व्हायला नक्कीच मदत होते. त्यामुळे परीक्षार्थींनी क्लासेसबद्दलच्या नकारात्मक विश्लेषणामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्त अडकण्यापेक्षा कुणाकडून काय चांगले मिळवता येऊ शकते आणि मार्कांमध्ये कशी improvement होऊ शकते, यावर भर देणे अगत्याचे असते.
अगदीच क्लास नाही तरी या प्रवासात आपापल्या परिस्थिती आणि गरजेनुसार ट्रॅकवर राहण्यासाठी आमच्या मास्तरांसारखा एक गुरू नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. यशाला शॉर्ट कट नसता, पण मेंटॉरच्या मदतीने यशासाठी लागणारा वेळ, कट शॉर्ट मात्र करता येऊ शकतो. फक्त सारथी (मेंटॉर-क्लास) म्हणून आपण शल्य निवडला का कृष्ण, यावर पुढील प्रवास अवलंबून असतो.