स्वत:शी स्पर्धा करा-निरंतर शिकत रहा : डॉ.शैलेश श्रीखंडे
बेळगाव : इतर कोणाशीही स्पर्धा न करता केवळ स्वत:शी स्पर्धा करा व निरंतर शिकत रहा, आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने पुढील दशक आपल्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या आव्हानांना आनंदाने सामोरे जा आणि नीतीमूल्याने काम करा, असा सल्ला टीसीएस मुंबईचे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी नवोदित पदवीप्राप्त डॉक्टरांना दिला. काहेर विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यामध्ये डॉ. शैलेश श्रीखंडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने गौरविण्यात आले. त्याचा स्वीकार करून आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हा सल्ला दिला. डॉ. अभिजीत गोगटे यांनी डॉ. श्रीखंडे यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले. डॉ. श्रीखंडे म्हणाले, बेळगावबद्दल मला विशेष आस्था आहे. माझे आजोबा आरएलएस कॉलेजचे संस्थापक सदस्य होते. माझे वडील डॉ. व्ही. एन. श्रीखंडे हे माझे रोलमॉडेल होते. आज बेळगावमध्ये येऊन ही पदवी स्वीकारताना मला येथील दिवस आठवतात आणि एक वर्तुळ पूर्ण झाले अशीच माझी भावना आहे. जगात कोठेही जा, परंतु सेवा करण्यासाठी टीसीएससारखी अन्य उत्तम जागा नाही, असे मला वाटते. सतत चांगल्याची कास धरा आणि पुढे जात रहा, असेही ते म्हणाले.