माकडांनी हल्ला केल्यास मिळणार भरपाई
थायलंडमध्ये मिळणार मोठी रक्कम
वानरांच्या उच्छादाची जाणीव आता अनेकांना झाली असावी. माकडं अनेकदा लोकांवर हल्ला करून त्यांचा जीव धोक्यात आणत असतात. कधी लोकांचा मोबाइल, चष्मा आणि खाद्यपदार्थ माकडं पळवून नेतात. तर कधी लोकांच्या घरातच शिरतात. असाच प्रकार एका महिलेसोबत घडला, माकडांनी हल्ला केल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आहे. केवळ तिच्यासोबतच नव्हे तर अनेकांसोबत असे घडले आहे.
संबंधित महिला ब्रिटनमधून आलेली पर्यटक होती. ती थायलंडमध्ये पोहोचली होती. आता तिच्यासारख्या पीडितांना थायलंड सरकारकडून भरपाई मिळणार आहे. थायलंडचे सरकार उपचारासाठी 69691 रुपये देणार आहे. माकडाच्या हल्ल्यामुळे पीडित काम करण्याच्या स्थितीत नसेल तर त्याला 180 दिवसांपर्यंत प्रतिदिन 699 रुपये दिले जाणार आहेत. माकडांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर संबंधिताच्या परिवाराला 2.33 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. ही योजना वन्यजीव संरक्षण कार्यालयाकडून राबविली जाणार आहे.
थायलंडच्या सेंट्रल एरियाच्या लोपबुरी प्रांतात माकडाकडून एका महिलेला गंभीर जखमी करण्यात आल्यावर ही योजना लागू करण्यात आली आहे. 36 वर्षीय पीडित महिला बाजारातून घरी जात असताना तिच्यावर दोन माकडांनी हल्ला केला होता. संबंधित भागातील रस्त्यांवर एकप्रकारे माकडांचेच राज्य आहे. या माकडांकडून अन्नासाठी लोकांवर हल्ला करण्यात येतो. माकडांनी महिलेच्या हातांमधील शॉपिंग बॅग पाहिली होती. ही महिला त्यावेळी स्वत:च्या कारमधून जात होती.
डॉक्टरांनी अरीकांता नावाच्या महिलेला 15 दिवसांच्या आरामाची सूचना केली आहे. या काळात सरकारकडून तिला 10,495 रुपये दिले जाणार आहेत. हा आकडा थायलंडमधील सरासरी मासिक वेतनाच्या सुमारे निम्म्याइतका आहे. नव्या योजनेच्या घोषणेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी माकडांची अधिक संख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे मूल्यांकन केले आहे. लोपबुरी प्रांतात अलिकडच्या काळातील हल्ल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लाइट्स आणि इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.