सीव्ही, नव्हे राशिफळ पाहून कंपनी देतेय नोकरी
चांगली नोकरी मिळविण्यासाठी उत्तम कौशल्य, एक चांगली पदवी आणि पुरेसा अनुभव असायला हवा, परंतु कधी तुम्ही या सर्व अटींसोबत तुमचे ग्रह चांगल्या स्थितीत असणे आवश्यक असल्याची अट कधी ऐकली आहे का? एक कंपनी उमेदवाराची रास बॉसच्या कुंडलीशी जुळत नसल्याने जॉब देण्यास नकार देत आहे.
चीनमध्ये ग्वांगझू या गुआंगडोंग येथील कंपनीने अलिकडेच नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून यात ‘डॉग ईयर’मध्ये जन्मलेल्या लोकांनी अर्ज करू नये, कारण तुमचा अर्ज आपोआप रद्द केला जाणार असल्याचे नमूद आहे.
चिनी राशिचक्र 12 प्राण्यांवर अवलंबून असते, ज्यात प्रत्येक राशीचा एक-एक प्राणी चिन्ह असते, उदाहरणार्थ उंदिर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, बकरी, माकड, कोंबडी, श्वान आणि डुक्कर अशी चिन्हं असतात. हे चक्र 12 वर्षांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक व्यक्तीचे जन्म वर्ष एका विशेष प्राणीच्या राशीशी जोडलेले असते. ही प्रणाली सूर्य कॅलेंडरऐवजी चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे.
कंपनीने स्वत:च्या प्रशासकीय स्टाफसाठी एका नोकरीची जाहिरात पोस्ट केली, ज्यात कार्य अनुभव, ऑफिस सॉफ्टवेअरची माहिती आणि 4 हजार युआन पगार मिळणार असल्याचे म्हटले होते. परंतु लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक छोटासा शब्द होता, ज्यात तुम्ही डॉग ईयरमध्ये जन्माला आला असाल तर कृपया स्वत:चा बायोडाटा पाठवू नका असे नमूद होते. या पोस्टमुळे चिनी सोशल मीडियावर वाद उभा ठाकला आहे, ज्यात अनेक लोकांनी कंपनीवर भेदभावाचा आरोप केला आहे.
कंपनीचा बॉस ‘ड्रॅगन ईयर’मध्ये जन्माला आहे, डॉग ईयरमध्ये जन्मलेल्या लोकांसोबत आपले पटणार नसल्याचे त्याचे मानणे आहे. चिनी रोजगार मार्केटात भेदभाव नवी गोष्ट नाही, अनेक लोकांनी डॉग ईयरमध्ये जन्मलेल्या लोकांना कंपनी विरोधात खटला दाखल करण्याची सूचना केली आहे.