महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परिवहनच्या व्यावसायिक हंगामाला प्रारंभ

11:14 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बसेसचा तुटवडा : परिवहनची कसरत, शैक्षणिक सहलीला होणार सुरुवात

Advertisement

बेळगाव : परिवहनच्या व्यावसायिक हंगामाला प्रारंभ झाला आहे. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्याने नियोजन करताना डोकेदुखी वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या आणि शैक्षणिक सहलींचे नियोजन करणाऱ्या शाळांची संख्या अधिक असते. मात्र शक्ती योजनेमुळे आधीच परिवहनची दमछाक होत आहे. त्यातच शैक्षणिक सहलींसाठी बसचे नियोजन करताना नाकेनऊ होणार आहेत. परिवहनला यात्रा-जत्रा, सण उत्सव, पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक सहलींतून समाधानकारक उत्पन्न प्राप्त होते. मात्र परिवहनकडे अतिरिक्त बसेसचा तुटवडा आहे. त्यातच बसवाहक आणि चालकांचीही कमतरता आहे. त्यामुळे परिवहनचा डोलारा विस्कळीत होऊ लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयातून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. यासाठी परिवहनची बस बुकिंग केली जाते. मात्र आधीच परिवहनकडे बसेसचा तुटवडा असल्याने शैक्षणिक सहलींसाठी बस पाठविताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Advertisement

शक्ती योजनेमुळे गतवर्षीपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषत: महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवेचे तीन-तेरा वाजू लागले आहेत. आधीच अपुऱ्या आणि अनियमित बससेवेबाबत सर्वसामान्यांतून तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक सहलींसाठी नियोजन करताना परिवहनसमोर अडचणी वाढणार आहेत. विशेषत: शैक्षणिक सहलींसाठी परिवहनच्या बसला प्राधान्य दिले जाते. शिवाय परिवहनकडून शालेय शैक्षणिक सहलींसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र मुळातच परिवहनकडे बसेसची कमतरता असल्याने शैक्षणिक सहलींना बसेस कशा पाठविणार, असा प्रश्नही पडू लागला आहे. अशा परिस्थितीत बसचे नियोजन केल्यास ग्रामीण आणि शहरी भागातील बससेवा विस्कळीत होणार आहे.

ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये शैक्षणिक सहलींबरोबर पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक असते. अशा काळात विविध ठिकाणी जादा बस सोडाव्या लागतात. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी, शैक्षणिक सहलींसाठी, आणि पर्यटन स्थळांसाठी बसचे नियोजन करताना. परिवहनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावत आहेत. मात्र शक्ती योजनेमुळे बसेसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. यामध्ये विद्यार्थी वर्गाची हेळसांड होत आहे. सुरळीत बससेवेसाठी दररोज परिवहनकडे निवेदनांचा ओघ सुरू आहे. त्यामुळे परिवहनला सुरळीत बससेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या व्यावसायिक हंगामात परिवहन बसचे नियोजन कसे करणार? हेच पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article