For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋषभ पंत, बुमराह, केएलचे कमबॅक

06:50 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋषभ पंत  बुमराह  केएलचे कमबॅक
Advertisement

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा : रोहितकडेच नेतृत्वाची धुरा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा रविवारी करण्यात आली. 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवल्या जाणाऱ्या सामन्यासाठी 16 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्माकडेच नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. बांगलादेशविरुद्ध मालिकेतून विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही कसोटी संघात पुनरागमन करणार आहेत. विशेष म्हणजे, मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान, यष्टीरक्षक ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज आकाश दीप व यश दयाल या चार युवा खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे.

Advertisement

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघात 4 फिरकीपटू आणि 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 2 यष्टिरक्षकांसह एकूण 8 फलंदाज आहेत. अपघातातून सावरल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर ऋषभ पंत कसोटीत खेळताना दिसणार आहे. नुकतेच झालेल्या दुलीप ट्रॉफीत अर्धशतक झळकावत त्याने आपली झलक दाखवून दिली आहे. याशिवाय, विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह देखील बांगलादेशविरुद्ध सामन्यात खेळताना दिसणार आहे. तसेच दीर्घ कालावधीनंतर केएल राहुलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे तर दिग्गज फलंदाज विराट कोहली या सामन्यात खेळणार आहे. दुसरीकडे, सतत फॉर्मशी झुंजत असलेल्या श्रेयस अय्यरला पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याला विशेष काही करता आले नाही.

रोहितकडेच नेतृत्व, चार फिरकीपटूंचा समावेश

कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचे सलामीवीर असतील. मधल्या फळीत विराटसह सरफराज खान व केएल राहुल यांचा पर्याय असणार आहे. तसेच सलामीवीर शुभमन गिलला देखील संधी देण्यात आली आहे. दुसरकीडे चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते, अशा परिस्थितीत अनुभवी आर.अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव व अक्षर पटेल या चार फिरकीपटूंचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाशदीप व यश दयाल यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. तसेच भारताच्या संघात यावेळी दोन यष्टीरक्षक असतील. पहिला यष्टीरक्षक हा ऋषभ पंत असेल. पंतला जर काही दुखापत झाली तर त्याच्या जागी ध्रुव जुरेल हा संघात येऊ शकतो.

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना - 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई

दुसरा कसोटी सामना - 27 ते 1 ऑक्टोबर, कानपूर

Advertisement
Tags :

.