मराठी भाषेसाठी भगव्या झेंड्याखाली एकत्र या
मराठी भाषिकांचे आवाहन : महामोर्चाला जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी/ बेळगाव
कन्नड सक्तीविरोधात आवाज उठवून मराठी भाषिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवार दि. 11 रोजी महामोर्चाची हाक दिली आहे. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही शेवटची संधी असून, मराठी भाषिकांनी एकत्र येऊन या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती समितीने केले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी शहरासह ग्रामीण भागात जोरदार जागृती करण्यात आली.
मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार मिळावेत, यासाठी अनेक वर्षे लढा दिला जात आहे. परंतु, हे सर्व हक्क डावलून कन्नड भाषा लादण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. बेळगावमध्ये मराठी व कानडी भाषिक एकत्रितपणे नांदत असले तरी, मराठी भाषिकांना त्यांचे हक्क मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून या ना त्या कारणाने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार वेळीच थांबविण्यासाठी महामोर्चाने उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महामोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या आवाहनानंतर शहर, ग्रामीण व खानापूर या तिन्ही घटक समित्यांची बैठक पार पडली. महामोर्चासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शनिवारी एपीएमसी मार्केटमध्ये जागृती करण्यात आली. तर युवा समिती सीमाभाग व युवा समितीची बैठक घेऊन महामोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील इतर भागात जागृती केली जात होती.
युवा समिती सीमाभागाचा पाठिंबा
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड सक्तीविरोधात महामोर्चाची हाक दिली आहे. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी युवा समिती सीमाभागाच्यावतीने शनिवारी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके होते. मोठ्या संख्येने सीमाभागातील तरुण मोर्चामध्ये सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी केली. महादेव पाटील, मनोहर हुंदरे, शिवाजी हावळाण्णाचे, मोतेश बार्देशकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांसह इतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कन्नडसक्ती थांबविण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर, अशोक घगवे, लक्ष्मण होनगेकर, विजय जाधव, इंद्रजित धामणेकर व इतर उपस्थित होते.
मार्केट यार्ड परिसरात महामोर्चासाठी जागृती
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी मार्केट यार्ड परिसरात कन्नड सक्तीविरोधी मोर्चासंदर्भात जागृती करण्यात आली. मराठी भाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल तर सर्वांनी सोमवारी होणाऱ्या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले. कन्नडसक्ती दिवसेंदिवस कठोर पद्धतीने राबविली जात असून, त्याला वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, अॅड. एम. जी. पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, लक्ष्मण होनगेकर, मोहन बेळगुंदकर, बाळाराम पाटील, युवानेते आर. एम. चौगुले यांच्यासह एपीएमसी मार्केट येथील मराठी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती म. ए. समितीची आज महत्त्वाची बैठक
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक रविवार दि. 10 रोजी दुपारी 3 वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.