महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आले हायकमांडच्या मना...असंतुष्टांचे चालेना!

06:30 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष पदानंतर पक्षाने लगेच विरोधी पक्षनेताही निवडला. 135 आमदारांच्या बळावर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांनी विरोधी पक्षनेतेपदी आर. अशोक यांची निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र व अशोक यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपमधील खदखद वाढली आहे. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तर उघडपणे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांचा उल्लेख त्यांनी चिंधीचोर असा केला आहे. विरोधी पक्षनेते पदावर उत्तर कर्नाटकातील नेत्याची निवड व्हावी, अशी मागणी त्यांनी संसदीय पक्ष बैठक सुरू होण्याआधी आपली भेट घेण्यासाठी निवासस्थानी आलेल्या केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली होती. ज्या अर्थी पक्षाने हे पद तब्बल सहा महिने रिक्त ठेवले आहे, त्याचाच अर्थ प्रभावी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याची निवड होणार, असा होता. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पडणार, याचा विश्वासही त्यांना असावा. मात्र, पक्षाने सर्व शक्यता खोट्या ठरवत आर. अशोक यांची निवड जाहीर केली आहे.

Advertisement

बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यापाठोपाठ माजी मंत्री रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद आदींनीही आपल्याच पक्षातील वेगवान घडामोडींबद्दल गळा काढला आहे. अशोक हे वक्कलिग समाजाचे नेते आहेत. तब्बल सातवेळा आमदार झालेल्या अशोक यांचा प्रभाव बेंगळूर वगळता अखंड कर्नाटकात जाणवत नाही. तरीही पक्षाने त्यांची निवड केली आहे. या निवडीमागेही येडियुराप्पा यांचा मेंदू असल्याचे अधोरेखित झाले आहे. कितीही नाही म्हटले तरी भाजपमध्ये गटबाजी आहेच. अशोक यांचे प्रत्येक गटाशी चांगले संबंध आहेत. आर. अशोक हे संघाच्या चाकोरीत काम करणारे असल्याने संघाचीही त्यांच्यावर मर्जी आहे. विरोधी पक्षनेता जर प्रभावी ठरला तर साहजिकच प्रदेशाध्यक्षांची प्रतिमा झाकोळली जाते. ही निवड करताना कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांचा जोर कमी होणार नाही, याचीही येडियुराप्पा यांनी काळजी घेतल्याचे जाणवते. कारण बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यासारखे फायर ब्रँड नेतृत्वाची जर निवड झाली असती तर भविष्यात विजयेंद्र यांच्या राजकीय वाटचालीला धोका निर्माण झाला असता. याची काळजी घेऊनच ही निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Advertisement

काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर घेण्यात आलेले एक अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडले. 4 डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसने तर या निवडीनंतर भाजपला चांगलेच हिणवले आहे. सहा महिन्यांनी का होईना, विरोधी पक्षनेत्याची निवड केल्याबद्दल भाजपचे अभिनंदन, अशा शब्दात काँग्रेसने भाजपला हिणवले आहे. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडीची प्रक्रिया बाकी राहिली आहे. या पदावर अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. चलवादी नारायण स्वामी व कोट श्रीनिवास पुजारी यांची नावे ठळक चर्चेत आहेत. हायकमांडच्या निर्णयानंतरच निवड जाहीर होणार आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात गुंतले आहेत. बसनगौडा पाटील-यत्नाळ हे कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मुळात आपण यांना मानतच नाही, स्वच्छ प्रतिमा असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आपण मंत्री होतो. त्यामुळे या चिंधीचोरांना मानण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत आपल्याच पक्षाच्या नेत्यांना त्यांनी चिंधीचोर ठरविले आहे.

भाजपने तर कर्नाटकात येडियुराप्पांशिवाय गत्यंतर नाही, हे सत्य स्वीकारल्याचे दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या निवडी झाल्या आहेत. विजयेंद्र यांच्या निवडीला विरोध करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडातून एकच प्रश्न येतो आहे, आम्ही पक्षात ज्येष्ठ आहोत. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. असे असताना आपल्यासमोर लहान असणाऱ्या विजयेंद्रांसमोर कसे वावरावे? त्यांचा हा प्रश्न रास्त असला तरी त्यांच्यासमोर सध्या तरी कोणता पर्याय नाही. कारण पक्षाने सारासार विचार करूनच निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत उफाळलेला असंतोष व खदखद दूर झाला नाही तर लोकसभा निवडणुकी दरम्यान धक्कादायक घडामोडी घडणार, याचे संकेत आहेत. अनेक जण काँग्रेसच्या वाटेवर आहेत. ते रोखण्यासाठीच पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत.

एनडीएशी मैत्री करणाऱ्या निजदमधील अंतर्गत संघर्षही संपता संपेना. प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांना ही मैत्री मान्य नाही. त्वरित निर्णय बदला नहून तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना दिला. त्याचे परिणाम म्हणून निजद नेत्यांनी इब्राहिम यांची पक्षातून हकालपट्टी केली. ही कारवाई इब्राहिम यांना मान्य नाही. घरात बसून किंवा कुठल्या तरी हॉटेलात बसून पक्षाचे निर्णय होत नसतात. कार्यकारिणीत चर्चा करून निर्णय घ्यावे लागतात. अजूनही आपणच अध्यक्ष आहोत. एनडीएशी मैत्री तोडली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. कुमारस्वामी मात्र भाजप आणि पर्यायाने एनडीएशी मैत्रीवर ठाम आहेत. याच जोरावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध कुमारस्वामी यांनी आघाडीच उघडली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्र यांचा गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातला हा व्हिडिओ असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. तब्बल दोन आठवड्यापासून या विषयावरील चर्चा थांबता थांबेना. बेळगाव अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी याच मुद्द्याचा वापर होऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article