आ. गोपीचंद पडळकर यांनी जत मधील लुडबुड थांबवावी : विलासराव जगताप
जत प्रतिनिधी
आ. गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये जी लुडबुड सुरू केली आहे, ती थांबवावी व स्वतःचा तालुका असलेल्या आटपाडी तालुक्यात लक्ष द्यावे असा सल्ला देत जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आ. पडळकर यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही पत्रकार परिषदेत निशाणा साधला.
भाजपमध्ये सुरू असलेल्या हुकूमशाहीबद्दल जगतापांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त करत थेट भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, बनाळीचे उपसरपंच अविनाश सावंत उपस्थित होते.
विलासराव जगताप यांनी आ. पडळकर यांचा त्यांच्या भाषेत खास समाचार घेतला.आ. पडळकर यांनी जतमध्ये निधी देत त्याचे मार्केटिंग चालू आहे. दोन कोटी दिले, पाच कोटी दिल्याचे सांगत त्यांनी जतमध्ये निधीचे राजकारण सुरू केले आहे. कोणतेही कारण नसताना आ. पडळकर यांनी जतमध्ये लुडबुड सुरू केली आहे. जतसाठी आपण भरपूर केले. अजून करत आहोत हे दाखविण्याची त्यांची सुरू असलेली धडपड केविलवाणी आहे.
जतमध्ये आ. पडळकर यांनी लुडबुड करण्याची गरज नाही,जतचे पाहण्यास आम्ही आणि येथील नेते, जनता, विद्यमान आमदार अजून खमके आहोत, त्यामुळे जतचे आम्ही पाहू असे सांगत जगतापांनी आ. पडळकर यांना जतमध्ये आपला डंका वाजविण्याऐवजी आपल्या स्वतःच्या आटपाडी तालुक्यात लक्ष द्यावे. आटपाडी तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत झालेला नाही त्याकडे लक्ष द्यावे असा उपरोधक सल्ला आ. पडळकरांना यावेळी दिला.
दरम्यान, जत तालुक्यातील २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय सध्या सुरू आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठक बोलावली होती. बैठक आपणच लावली म्हणत त्या गावातील सरपंचानी मुंबईला बैठकीला यावे असे आवाहन आ. पडळकर यांनी प्रसारमाध्यमांमार्फत केले. मुंबईला बैठक घेण्याऐवजी ती बैठक जत किंवा सांगली येथे हवी होती. पण आ. पडळकर यांनी चुकीची मागणी करत मुंबईला बैठक लावली, ती बैठकही झाली नसल्याचे सांगत जगताप यांनी आ. पडळकर यांच्या भूमिकेवर जोरदार टिकास्त्र सोडले.
तसेच आ. गोपीचंद पडळकर हे पदाला हापापलेले आहेत, हे उघड झाले आहे. आटपाडी येथील भाजपच्या निवडणूक प्रचारप्रमुखपदी अमरसिंह देशमुख होते. त्यांच्या विषयी कसलीही तक्रार नसताना त्यांना त्या पदावरून काढून ते पद आ. पडळकर यांनी स्वतःकडे घेतले. तर जत मध्ये रवी पाटील यांच्या बाबतीत तक्रार असताना त्यांना हटवले नाही, ही भाजपची भूमिका साफ चुकीची आहे.असं जगताप म्हणाले आहेत.
बावनकुळे यांच्यावर निशाणा
नेते विलासराव जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांच्यावरही जोरदार तोफ डागली. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सध्या ते चुकीच्या मार्गाने जात आहे. जत व आटपाडीबाबत बोलायचे झाले तर पक्षाला कुठे घेवून जात आहेत, हा मोठा प्रश्न आहे. जत व आटपाडी तालुक्यात त्यांनी जे राजकारण सुरू केले आहे, त्यास जातीयवादाचा वास येत असल्याची खरमरीत टिका जगतापांनी केली आहे.