‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी बेळगावच्या स्नुषा
कोण्णूर येथील कर्नल ताजुद्दिन यांच्याशी विवाह : गावात गोडधोड वाटून आनंद साजरा
बेळगाव : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याचे समाधान देशवासियांना आहे. त्याचवेळी या मोहिमेचा सविस्तर वृत्तांत प्रसारमाध्यमांना देण्याची जबाबदारी ज्या दोन महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली त्यांचा नितांत अभिमानही आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी विशेष अभिमानास्पद आणि कौतुकाची बाब म्हणजे प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्यापैकी कर्नल सोफिया या बेळगाव जिल्ह्याच्या स्नुषा आहेत. पत्रकार परिषदेत ज्या सफाईदारपणे या दोन महिलांनी माहिती दिली, ती पाहता प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला. भारतीय सेनेच्या या दोन महिला अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्याचवेळी कर्नल सोफिया या बेळगाव जिल्ह्याच्या स्नुषा असल्याची माहितीही पुढे आली. त्यामुळे तमाम नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या बडोदाच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून 1997 मध्ये त्यांनी जैव रासायनिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर चेन्नईमधील ‘ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी’मध्ये प्रशिक्षण घेऊन 1999 मध्ये त्या लष्करी सेवेत दाखल झाल्या. तेव्हा कारगिल युद्ध सुरू होते. आम्ही दोघी बहिणी असून आमच्यापैकी एकटीने लष्करात दाखल व्हावे, अशी आईची इच्छा होती, असे त्या सांगतात. कर्नल सोफिया कुरेशी यांनी 2016 मध्ये फोर्स-18 या आशियाई देशांसह अन्य देशांनी भाग घेतलेल्या ‘मल्टिनॅशनल फिल्ड ट्रेनिंग एक्सरसाईज’मध्ये भारताच्या 40 सदस्यीय तुकडीचे नेतृत्व केले. तेव्हा त्या लेफ्टनंट कर्नल होत्या. हा बहुमान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्याचा मान विंग कमांडर व्योमिका यांच्यासह त्यांना मिळाला.
कर्नल सोफिया या बेळगाव जिल्ह्याच्या स्नुषा आहेत. त्यांचे पती ताजुद्दिन बागेवाडी हेही लष्करी सेवेत कर्नल पदावर आहेत. गोकाक तालुक्यातील कोण्णूर हे कर्नल ताजुद्दिन यांचे गाव. त्यांचे कुटुंबीय कोण्णूरमध्येच वास्तव्य करून आहेत. कोण्णूरच्या स्नुषेच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल कोण्णूरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. थेट सोफिया यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना गोडधोड भरवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. सोफिया यांचे सासरे गौस बागेवाडी यांचा सत्कारही करण्यात आला. आपला मुलगा ताजुद्दिन व स्नुषा सोफिया हे दोघेही लष्करी सेवेत आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. सोफिया सुटीत कोण्णूरला येतात. येथे आल्या की ज्वारीची भाकरी व गावरान चिकन त्यांना आवडते. मुलगा आणि सुनेच्या लष्करी सेवेबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असे गौस यांनी सांगितले. कर्नल ताजुद्दिन सध्या झांशीत आहेत. लष्करी सेवेत असतानाच ताजुद्दिन व सोफिया यांच्यात प्रेमांकुर झाला. दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर चर्चा करून संमतीने 2015 मध्ये विवाह केला.
अभिमानाने आमचा ऊर भरून येतो आहे : गौस बागेवाडी
मुलगा ताजुद्दिन व सून सोफिया हे दोघे रमजानला येणार होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत. आता बकरी ईदला ते कोण्णूरला येणार आहेत. ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला कळवणारी सून सोफियाबद्दल आम्हाला अभिमान वाटला. बडोद्यामध्ये ताजुद्दिन व सोफिया यांचे लग्न झाले. काहीकाळ ते दोघे एकत्र सेवा बजावत होते. ऑपरेशन सिंदूरबद्दल आम्ही सुनेशी बोललो नाही. मुलाशी बोलणे झाले. सुनेच्या कामगिरीने केवळ आम्ही कुटुंबीयच नाही तर कोण्णूर व गोकाकवासीय आनंदात आहेत. अभिमानाने आमचा ऊर भरून येतो आहे, असे गौस बागेवाडी यांनी सांगितले.