शौचालयांची सोय नसलेल्यांची माहिती जमवा
जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेंतर्गत शौचालयाची सोय नसलेल्या कुटुंबीयांची माहिती जमवून सिटीझन पोर्टलमध्ये त्यांच्याकडून अर्ज करावे. यासंबंधी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जागृतीही करावी, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. गुरुवारी जि. पं. सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध शासकीय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ग्राम पंचायतींना वरील सूचना करण्यात आल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत नागरिकांना कामे देणे सक्तीचे आहे. तालुकानिहाय ठरविलेले उद्दिष्ट गाठावे. 2023-24 सालासाठीचे प्रत्येक ग्राम पंचायतीत कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.
शाळा आवारात शौचालय बांधणे, खेळाचे मैदान, स्वयंपाक घर आदी कामे प्राधान्यक्रमाने हाती घ्यावीत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांच्याकडून सिटीझन पोर्टलमध्ये अर्ज करावेत. बेळगाव व खानापूर तालुक्यात कचऱ्याची उचल व त्याची विल्हेवाट व्यवस्थित केली जात नाही, अशा तक्रारी आहेत. प्रत्येक ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात ही कामे व्यवस्थितपणे करावीत. मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम चिकोडी तालुक्यातील करोशी येथे पूर्ण झाले असून ते त्वरित सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली. सर्व ग्रा. पं. ना एफटीके किट वितरित केले असून पिण्याच्या पाण्याची सातत तपासणी करावी, बेळगाव व चिकोडी विभागात लवकर मायक्रो बॉयोलॉजी लॅब सुरू करावी. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी काळजी घ्यावी, अशी सूचनाही केली. यावेळी बसवराज मुरगामठ व अधिकारी उपस्थित होते.