खेडच्या शासकीय धान्य गोदामाची पडझड! महसूल विभागाची धावाधाव
धान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
खेड / प्रतिनिधी
खेड शहरातील समर्थ नगर येथे असलेल्या शासकीय धान्य गोदामाची शनिवारी रात्रीच्या सुमारास पडझड झाल्याने एकच खळबळ उडाली. या पडझडीमुळे गोदाम कोसळण्याच्या स्थितीत असून महसूल विभागासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. तसेच पडझडीमुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. समर्थनगर येथे ब्रिटिशकालीन दोन शासकीय धान्य गोदामे होती. त्यातील एका धान्य गोदामाच्या देखभालीसह दुरूस्तीकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे गोदाम पूर्णतः जमिनदोस्त झाले होते. सद्यस्थितीत ५०० मॅट्रिक टन धान्याची क्षमता असलेल्या शासकीय धान्य गोदामात धान्याचा साठा करून ठेवण्यात येत आहे. मात्र, या धान्य गोदामाची शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक पडझड झाल्याने महसूल विभागाची धावाधावच सुरू झाली.
या धान्य गोदामात असलेला गहू तांदुळ, साखरचा साठा सुरक्षितस्थळी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सद्यस्थितीत महसूल विभागाकडे धान्य सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे महसूल विभागाची डोकेदुःखी वाढली असून धान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पडझड झालेल्या धान्य गोदामातील धान्य नेमके ठेवायचे कुठे, असा प्रश्नही महसूलसमोर उभा ठाकला आहे.