शहर परिसराला थंडीची चाहूल
तापमान घटले; ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या
प्रतिनिधी/ बेळगाव
परतीच्या पावसानंतर आकाश निरभ्र होत असून शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. सायंकाळी 7 नंतर हळूहळू थंडी वाढत असून सकाळी 8 पर्यंत थंडी कायम राहत आहे. पहाटे फिरणाऱ्यांची संख्या थंडीमुळे कमी होत आहे. स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी यासारखे उबदार कपडे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. 28 ते 30 अंशांपर्यंत असणारे तापमान 25 ते 26 अंशांवर पोचत आहे.
साधारणत: कोजागरी पौर्णिमेपासून थंडीला सुऊवात होते. दिवाळीमध्ये याची तीव्रता वाढते. पण, यावर्षी दिवाळीपर्यंत पाऊस बरसतच राहिल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून हिवाळ्याची खरी चाहूल आता लागत आहे. सकाळी अनेक भागात धुक्यामुळे वाहनचालकांना अतिदक्षतेने वाहन चालवावे लागत आहे. धुक्यामुळे आजारांनाही निमंत्रण मिळते. यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे.
थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक, महाविद्यालयातील जादा क्लासेससाठी जाणारे विद्यार्थी चहाटपरींवर वाफाळलेला चहा घेताना दिसून येत आहेत. थंडीमुळे सर्दी, खोकला यासारख्या किरकोळ तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सायंकाळी थंडीचा कडाका जावणत असल्याने नागरिक उबदार कपडे परिधान करण्याकडे भर देत आहेत.
सकाळी 8 पर्यंत थंडी तर दुपारी उकाडा जाणवत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सर्दी, खोकला, ताप आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. ऊन व थंडीमुळे संसर्गजन्य आजार बळावतात. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. उबदार कपडे व मास्कचा वापर केल्यास आजारांचा संसर्ग होण्याचा धोका टाळता येणार असून यासाठी नागरिकांनी नियोजन करणे गरजेचे आहे.