थंडीच्या लाटा
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरसह उत्तर भारत आणि देशाच्या विविध भागात सध्या थंडीने उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसून येते. चार दिवसांपूर्वी श्रीनगरवासियांनी 50 वर्षांतील सर्वांत थंड दिवसाचा अनुभव घेणे, हा त्याचाच भाग. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत थंडीचा हा कडाका कसा राहतो आणि या पर्यटनहंगामात पर्यटनप्रेमींची सफर कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काश्मीरमध्ये हिवाळ्यातील सर्वाधिक कडाक्याच्या थंडीचा 40 दिवसांचा कालावधी म्हणजेच ‘चिल्लई कलान’ होय. त्याचा अर्थ पर्शियन भाषेत कडक हिवाळा असा होतो. 21 डिसेंबरपासून या हंगामाला सुऊवात झाली असून, रक्त गोठवणारी थंडी काय असते, याचा अनुभव नागरिक घेताना दिसतात. राजधानी श्रीनगरच्या थंडीची वर्णने आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. ही थंडी समजून घेतानाही अंगावर शहारे येतात. मागच्या रविवारी तर श्रीनगरमध्ये रात्रीचे तापमान पार उणे 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तर सकाळचे तापमानही उणे 3.2 अंश सेल्सिअसपर्यंत खालावल्याचे पहायला मिळाले. थंडीची तीव्रता इतकी भयानक होती, की अगदी दल सरोवराचा पृष्ठभागही गोठल्याचे दर्शन घडले. इतकेच नव्हे, तर काश्मिरातील तलाव, नद्या, धबधबे यांच्यासह पाण्याचे पाईपही गोठले आहेत. या भागातील अनेक पर्यटनस्थळांसह उंचावरील भागात सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू असून, सर्वत्र बर्फाची चादर पहायला मिळते. तापमान गोठणबिंदूपेक्षा काही अंशांनी खाली आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्वते, मंदिर, जलाशये आणि चिनारची झाडे बर्फाने वेढल्याने पर्यटननगरीचे सौंदर्य अधिकच न खुलले तर नवल. गुलमर्गपासून जवळच असलेल्या टंगमर्गच्या ट्रुंग भागातील गोठलेला धबधबा हा तर निसर्गाचा चमत्कारच ठरत आहे. असे गोठलेले धबधबे काश्मीरच्या सौंदर्यात भर पडत असून, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. असे असले, तरी अशा अभूतपूर्व थंडीशी सामना करत पर्यटन करणे, ही आव्हानात्मकच बाब ठरावी. कारण या काळात पर्यटकांना आणि नागरिकांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. वाहने अडकून पडणे, वीज वितरणात अडथळे निर्माण होणे, अशी असंख्य संकटे उभी राहतात. खरे तर अशा कडाक्याच्या थंडीत हिटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठी मदत होते. मात्र, यंदाच्या थंडीमध्ये काश्मीर व परिसरातील वीज यंत्रणाही कोलमडली. परिणामी लोकांना पारपंरिक पर्यायांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. अर्थात कितीही अडचणी असल्या, तरी काश्मीरचे सौंदर्य हे थंडीतच अनुभवावे, असे म्हटले जाते. त्यामुळे नववर्षाच्या मुहूर्तावर अनेक पर्यटकांची पावले बर्फाच्छादित प्रदेशाच्या दिशेने पडत राहतातच, हे वेगळे सांगायला नको. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी सुरू असून, या भागात उत्साहाचे वातावरण दिसते. शिमला हेदेखील पर्यटकांचे आवडते ठिकाण. तेथे विंटर कार्निव्हलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. त्याचा आनंद देशभरातून आलेल्या पर्यटकांनी घेतला, यातच सर्व आले. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हेमकुंड साहिब व कुमाऊन हा भागही थंडीमध्ये मोहरून जात असतो. हिमवृष्टीने ही पवित्र क्षेत्रेही खुलली असून, तेथेही पर्यटक आनंद घेताना दिसतात. मागच्या काही दिवसांमध्ये राजधानीही धुक्यात हरवली आहे. उत्तरेतील थंडीच्या परिणामामुळे दिल्लीमध्ये गार वारे वाहत असून, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह लगतच्या राज्यांमध्ये गारेगार वातावरण आहे. उत्तरेत थंडी पडली, की त्याचा परिणाम मध्य भारतासह दक्षिण भारतावरही होत असतो. त्यामुळे मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्ये गारठलेली पहायला मिळतात. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नगरसह अनेक जिल्हे थंडीने कुडकुडले आहेत. पुढच्या दोन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण देशातील तापमान आणखी खालावण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हे पाहता पुढचा टप्पा आणखी कसोटीचा असू शकतो, असे म्हणायला जागा आहे. नाताळ सण, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करण्यासाठी लाखो पर्यटक याच काळात घरातून बाहेर पडतात. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह वेगवेगळ्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी हेच दर्शवते. अर्थात पर्यटनाचा आनंद लुटताना दक्षता बाळगणेही आवश्यक ठरते. सध्या अनेक भागांत धुक्याचे प्रमाण मोठे आहे. धुक्याच्या दुलईत वाहन चालवणे चालकासाठी आव्हानात्मक असते. अनेकदा रस्ता भरकटण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या पातळीवर काळजी घेणे आवश्यक होय. ऐन थंडीतले प्रदूषण हीदेखील मोठी समस्या होय. दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो, तो थंडीच्या महिन्यातच. मात्र, एकदा थंडीचा हंगाम संपला, की यावर फारसा विचार करताना कुणी दिसत नाही. आगामी काळात तरी दिल्लीसह एकूण विविध राज्यातील तसेच शहरांतील प्रदूषणाकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. सृष्टीची अनेक ऊपे आहेत. रिमझिम पाऊस, कोवळे ऊन याप्रमाणेच गुलाबी थंडी हीदेखील सृष्टीचे एक मनोहर रूप म्हणून ओळखली जाते. थंडीचा हा महिना कडाक्याचा असला, तरी तो ऊर्जादायी असाच. या काळात उबदार कपडे परिधान करणे, सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे, गरमागरम फेसाळता चहा पिणे, शेकोटीभोवती गप्पांचा फड जमवणे याचा आनंदच वेगळा. त्यात डोंगरदऱ्या पालथ्या घालता आल्या, रमणीय पर्यटनस्थळांना भेट देता आली, तर त्याची लज्जत वाढतच जाते. आजवर अनेक कवी वा लेखकांनी पावसाला आपल्या शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसे गुलाबी थंडीभोवतीही गीतकार, कवींचे शब्द पिंगा घालताना दिसतात. कुणी ‘आला थंडीचा महिना.. झटपट शेकोटी पेटवा,’ असे म्हणते. कुणाच्या गीतातून गारवा...गारवा...हवा हवा, अशी भावना व्यक्त होते. तर कधी ‘ठंडी हवा ये चांदनी सुहानी,’ अशी उपमा या ऋतूराजास दिली जाते. ‘ठंडी ठंडी ये हवा...तेरा काम क्या यहाँ,’ असा अवखळ सवालही कधी केला जातो. हा मौसम तसा आरोग्यदृष्ट्याही हेल्दी मानतात. अशा या शीतल ऋतूची पौष्टीक आहाराशी सांगड घालत प्रत्येकाने आपली ऊर्जा वाढवत नेणे महत्त्वाचे.