थंडीची धुंदी थंडीची
गेलेल्या पावसासोबतच येणाऱ्या थंडीचं आगमन मोठ्या दिमाखात झालेलं आहे. धुक्यानं भरून गेलेलं शिवार एखाद्या शाल पांघरलेल्या पुरंध्रीसारखं दिसायला सुरुवात झाली. शेतातलं धान्य कापून लक्ष्मी घरी आलेली आहे. लग्नसराईसुद्धा सुरू झालेली आहे. अन्नधान्याचा सुकाळ, वातावरणातली गुलाबी थंडी आणि सर्वत्र भरून राहिलेला उत्साह यामुळे वर्षभरातला सर्वात आनंदाचा काळ सुरू आहे.
आपल्या भारतीय उपखंडात थंडीच्या मोसमाचं कौतुक थोडं जास्तच आहे. कारण आपल्याकडे थंडीचे दिवस हे मोठे प्रसन्न असतात! सुगीचे दिवस असतात. अंगामध्ये असलेली ऊर्जा या दिवसात दुप्पट झालेली असते. साहजिकच हे समृद्धीचे दिवस सर्वांना हवेसे वाटणारच. त्यात काही नवल नसतं आणि मुख्य असणाऱ्या गरजा भागल्या की साहजिकच प्रेम, प्रणय यासारख्या गोष्टीकडे माणसाचं लक्ष जाणार आणि त्यावर ते केंद्रित होणार हे अगदी साहजिक आहे. हा महिनाच मोठा गुलाबी असतो. थंडीची हुडहुडी खरी भरलेली असतेच शेकोटीची ऊब हवीहवीशी वाटत असते की आणखीन कसली ऊब हवीहवीशी वाटत असते ते त्या थंडीला ठाऊक आणि त्या थंडीचा शिडकावा अंगावर झालेल्या उत्सुक व्यक्तींनाच ठाऊक! या मोसमात माणसाच्या गुलाबीपणाला बहर यावा याची सोय निसर्गानेच करून ठेवलेली असते. त्यामुळे
मग माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची!
थंडीचा फुलतो काटा
अर्ध्या रातीला आता कुठं जाता?
असं विचारावंसं ‘तिला’ वाटतंच. प्रवीण दवणे लिखित ही लावणी गायलीय रंजना जोगळेकर यांनी! या लावणीचा तोराच असा आहे की आपोआपच जाणाऱ्याने मागे वळून पाहावं आणि सहजच मुक्कामी रहावं. उगाच थंडीचा जीव धोक्यात कशाला घालावा? शरद उपाध्ये आपल्या राशीचक्र कार्यक्रमामध्ये प्रत्येक राशीच्या स्वभावाचं वर्णन करण्यासाठी एकेक गाणं वापरत असत. त्यामध्ये वृषभ राशीच्या वर्णनासाठी त्यांनी ‘मलमली तारुण्य माझे’ हे गीत वापरलंय! मूळचं हे गाणं आहे आशाजींचं. ते गाणं सर्वांगसुंदरच आहे पण त्यातलं अतिसुंदर कडवं म्हणजे
लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
या राशीच्या माणसांचा स्वभाव हा विषय क्षणभर बाजूला ठेवला तरीही या गाण्याचा विचार केला तर नक्कीच थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांचं वर्णन आहे, याची खात्री होते. कारण पहाटे पहाटे गुलाबी थंडी पडायला लागते ती कोजागिरी पौर्णिमेनंतर. इथे तर दिवाळी नुकतीच उलटून गेलेली असतानाची ही गुलाबी थंडी आहे. आणि वेळ पहाटेची आहे. यात शृंगारचा भर असतो म्हणून ती त्याला आर्जव करते की पहाटेच्या थंडीने येणारी शिरशिरी घालवण्याकरता आपण दोघांनी परस्परांमध्ये एकजीव होऊन जावं. आणि या गाण्यातील ‘तारुण्य’ या गोष्टीचं वर्णनच इतकं सुंदर आहे!
अर्थात लिहिता हात सुरेश भटांसारख्या सिद्धहस्त कवीचा असल्यामुळे तेही साहजिकच आहे म्हणा! यातलं तारुण्य आहे हे मलमली आहे. आणि अतिशय हळुवार, पारदर्शी, आपल्या मनातल्या इच्छा मुळीच न दडवणारं, तरीही अवगुंठित असल्यामुळे अतीव मादक आणि आकर्षक असणारं हे तारुण्य आहे. अंगावर मलमलीचं वस्त्र पांघरून घेतल्यानंतर त्याचा देह झाकण्याच्या कामी काही उपयोग होईलच असं नाही. उलट मादकता शंभरपटीने वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण ऊब मात्र मिळते पण ती सुद्धा कशी की दुसऱ्या देहाची हवीशी वाटावी अशीच! हेच त्या राशीच्या मूळ स्वभावाचं वर्णन आहे! निवडणाऱ्या व्यक्तीलासुद्धा नमस्कार!
या थंडीचा गारवा नवथर तारुण्याला वेगळ्या प्रकारे झेपत नाही. आयुर्वेद तज्ञ सांगतात त्याप्रमाणे बाहेर गारवा वाढत गेला की देहाच्या आतला अग्नी रसरसून चेतायला सुरुवात होते. आणि ज्वाळा वाढत जातात. त्या अग्नीला उत्तम आणि पौष्टिक आहार आणि व्यायाम, त्याचसोबत देहाचे उपभोग, या योग्य त्या गोष्टींची आहुती द्यावी लागते. नपेक्षा तो देहाला आणि मनाला खाऊन टाकतो. आणि जिचा असा अग्नी चेतलेला आहे ती म्हणते,
चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी गरम लोकरी शाल
पर झोप नाही आली जागरण झालं काल
रंगमहाली ऊब असून का काटा फुलतो नवा
गं बाई बाई झोंबतो गारवा
थंडीतल्या अग्नीचं हे अतिशय सूचक वर्णन! लाल रंग हे प्रमत्त प्रणयाचंही प्रतीक आहे. स्वत:ला तमाशाचा बिलकुलच शौक नसणाऱ्या खेबुडकरांनी हे गीत लिहिलंय. ‘गणानं घुंगरू हरवलं’ या सिनेमासाठी! आणि अशा प्रकारच्या गाण्यांचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे आशाताई हे समीकरणच आहे. पण थंडीच्या दिवसाला समर्पित केलेली ही अशी गीतं मोठी मजा आणतात. माणसाचा आनंद व्यक्त करण्याचं सर्वात प्रभावी आणि सुंदर साधन म्हणजे कला. आणि त्यातही सर्वोत्तम साधन म्हणजे गाणं! त्या बाबतीत आपली मराठी भाषा समृद्ध आहे. प्रत्येक ऋतूवर इथे गाणी झालेली आहेत. थंडीच्या मोसमाबद्दल अशी कितीतरी गाणी आहेत. मराठीत कशाला? सर्व भाषांमध्ये असतीलच. पाश्चिमात्य जगात थंडीचा संबंध थेट मृत्यूशी जोडलेला असतो. कारण तिथला हिवाळा हा खरोखरच साक्षात मृत्यूचं दार उघडणारा असतो. आपल्याकडे याउलट असतं. आपल्याकडे थंडीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस. वर्षभरातला खूप आनंदाचा काळ. वर्षभराची ताकद, जोम अंगात भरून घेण्याचे दिवस! केलेल्या कष्टांचे मधुर फळ चाखण्याचे दिवस असतात. त्यामुळे आपल्या भारतीय उपखंडातल्या थंडीची मजाच मोठी वेगळी असते. अर्थात थंडीच्या दिवसांत खटकेबाज गाण्याकडे लक्ष आधी वेधलं जातं आणि म्हणूनच थंडीची गाणी म्हटलं की पटकन लावण्या आठवतात.
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
आहे की नाही थंडीचा कडाका थेट तब्येतीपर्यंत पोचवणारं गाणं? द मंगेशकर मंडळींपैकी नेमकीच गाणी अतिशय सुरेख पद्धतीने मांडणाऱ्या या उषाताई मंगेशकर! उगीच नाही आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे! अर्थात हे गीत चक्क दादा कोंडके यांनी लिहिलंय. त्यामुळे गाण्यातील ‘एका शब्दाचे अनेक अर्थ’ याविषयी जाणकारांना सांगायला नकोच. ‘समझनेवालों के लिये इशारा काफी होता है।’ आजकाल जर काही हरवलं असेल तर हाच सूचकपणा. सगळं काही सगळ्या ठिकाणी उघडंवाघडं करून सांगण्याच्या प्रवृत्तीमुळे उत्सुकता संपली आणि बटबटीतपणा वाढत चाललाय. निदान या थंडीच्या सीझनमध्ये देहाप्रमाणे अभिव्यक्तीवरही योग्य ते अवगुंठन घ्यायला आपण शिकलो तर थंडीची मजा दुप्पट होईल असं वाटतं.
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु