सावंतवाडीतील कोल्ड्रिंक व्यावसायिकाने गळफास घेत संपवले जीवन
सावंतवाडी-
सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौक येथील प्रसाद कोल्ड्रिंक हाऊसचे मालक प्रसाद सुभाष पडते (40) रा. जुन्या पंचायत समिती कार्यालय नजीक ,सालईवाडा सावंतवाडी याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. गेल्या दोन दिवसापासून त्यांचे कोल्ड्रिंकचे दुकान बंद होते. बुधवारी दुपारी त्याच्या घराच्या समोरील बंद दरवाजा कडून बाहेर रक्त आलेले निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव आदींचे पथक दाखल झाले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने नक्की काय प्रकार झाला हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला . आतमध्ये जाऊन पाहिले असता प्रसाद पडते हा घराच्या छपराच्या लोखंडी रॉडला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी पडते याचे नातेवाईक आबा पडते, सदानंद पडते व सालईवाड्यातील रहिवासी व नागरिक उपस्थित होते. प्रसाद पडते याच्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. प्रसाद पडते यांचा जयप्रकाश चौक येथे स्वतःचा कोल्ड्रिंक व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई - वडिलांचे यांचे निधन झाले होते . त्यामुळे ते एकटेच घरी राहत असत .