शहापूर खडेबाजार मुख्य रस्त्यावरील जलवाहिनी गळतीची नगरसेवकांकडून दखल
तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात
बेळगाव : खडेबाजार शहापूर येथे मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मुख्य रस्त्यात जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्ती करणेही अवघड होते. अखेर ही बाब स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांना समजताच त्यांनी तातडीने एल ॲन्डटीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून कामाला सुरुवात केली. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वेळेत दुरुस्ती होत नसल्याची तक्रारही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून खडेबाजार मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली होती. यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी गटारीत जात होते. एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत होता. याची माहिती नगरसेवक रवी साळुंखे यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ एल ॲन्डटी कंपनीशी संपर्क साधला. सोमवारी सकाळपासून ज्या ठिकाणी गळती होती, त्या ठिकाणचा काँक्रीटचा रस्ता फोडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या समस्येची त्वरित दखल घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.