solapur : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आचारसंहिता लागू
सोलापूर जिल्ह्यात 12 ठिकाणी आचारसंहिता लागू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, ४ नोव्हेबर रोजी निवडणूक जाहीर करत आचारसंहिता लागू केली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
निवडणूक काळात प्रचारात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगी आयुष्यावर टिपणी केल्यास अशा प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक कार्यालयाकडून उमेदवारांना देण्यात आला आहे. नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. कसल्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी,
यासाठीसर्व मुख्याधिकाऱ्यांनी सतर्क रहावे, अशी सूचना नगर प्रशासन अधिकारी योगेश डोके यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात १ अ वर्ग नगरपरिषद (बार्शी) ३ ब वर्ग नगरपरिषद (पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज), ७ क वर्ग नगरपरिषद (मैंदर्गी, दुधनी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, कुडूवाडी, मोहोळ) व १ नगरपंचायत (अनगर) एकूण ११ नगरपरिषदा व १ अनगर नगरपंचायत असे एकूण १२ ठिकाणी निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
प्रचारात उमेदवारास कोणताही पक्ष अथवा उमेदवार, वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा अथवा सामाजिक गट यांच्यामध्ये मतभेद होणारी किंवा ज्यामुळे, त्यांच्यातपरस्परांमध्ये द्वेष किंवा तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करणार नाहीत. असे झाल्यास हा आचासंहितेचा भंग ठरविण्यात येणार आहे. इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येईल, तेव्हा ती पक्षांची धोरणे किंवा कार्यक्रम, त्यांचे पूर्वीचे कार्य यांच्यापुरती मर्यादित असेल. खासगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टिका करण्यापासून, पश्न आणि उमेदवार दूर राहतील, अशाही सूचना उमेदवारांकरिता देण्यात आले आहेत.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांना एखाद्या व्यक्तीची राजकीय मते वा कामे कितीही नापसंत असली तरी शांत आणि स्वस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक माणसाच्या अधिकारांचा आदर केला जाईल. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे या उपायांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.