कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नारळ-सुपारीचा वाद अन् रक्ताळलेला कोयता..

01:53 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर  / कृष्णात पुरेकर :

Advertisement

सूर्य मावळतीला निघालेला.. मेंढरं घेऊन बाळू गोठ्यात आला, ती दावणीला बांधली अन् घरी आला, पाणवठ्यावरून पत्नी अनुसयाही घरात आली, तिनं चूल पेटवली.. अन् इतक्याच बाळूची नजर देव्हाऱ्यातील नारळ-सुपारीवर गेली.. ते पाहून त्याला राग आला, त्यातून दोघांत भांडण सुरू झाले, बाळूने सुपारीला हात लावताच.. ती खाली पडली... अन् आक्रित घडलं.. तो कोयता घेऊन पत्नीच्या अंगावर धावून गेला, आई, चुलती आडवी आली, त्यांच्यावरही त्याने हल्ला केला, वडील, चुलते, पुतणेही त्याला अडवत होते, अन् संचारल्यागत तो कोयता घेऊन उड्या मारत घरभर फिरत होता... .

Advertisement

पाटण-कोयनानगर मार्गावरील गोषटवाडी. पाटणपासून 30 किलोमीटरवरील गाव. तेथून दोन डोंगर पायी गेल्यानंतर वसलेली अवघ्या 40 घरांची खांडेकरवाडी.. गावात बाव आहे, पण तिचंही पाणी खोल गेलेलं, परिणामी गावात तीन दिवसांतून एकदाच पाण्याचा टॅंकर यायचा. पंचवीस वर्षापुर्वीची एप्रिलमधील ही स्थिती.. खांडेकरवाडीत चाळीसभर घरं.. त्यातील एक बाळू पवाराचं. घर. बाळू पवार अन् पत्नी अनुसया.. दोघंही पस्तीशीतील.. सोबत आईवडीलही होते. संसार चालला होता, पण पाळणा काही हलत नव्हता. त्यातूनच अनुसयाने कोणाचं तरी ऐकून घरातील देव्हाऱ्यात नारळ-सुपारी आणून ठेवली. यावरून दोघांत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाद सुरू होता. पण सारं अलबेल होतं.

खांडेकरवाडीतील 7 एप्रिल 2001 ची सायंकाळ.. बाळू गोठ्यातून आला, अन् थेट घरात शिरला. पत्नी अनुसयाही पाठोपाठ गेली, देव्हाऱ्यातील सुपारी अन् नारळ त्याने घेण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसया अडवत असतानाच सुपारी बाजूला पडली अन् त्याचा राग मस्तकात गेला, त्याच आवेषात त्याच्या हाती जवळचा कोयता दिसला, अन् ओरडतच तो कोयता हवेत फिरवू लागला, अनुसयाच्या अंगावर तो धावून जात असतानाच त्याची आई आडवी आली, पाठापोठ चुलतीही आली, त्याने दोघींवरही कोयत्याने हल्ला केला, आरडाओरडा पाहून त्याचे वडील, चुलतेही घरात आले, त्याने त्यांच्यावरही कोयत्याचे वार केले. हे पाहून त्याचे चुलतभाऊ आणि अन्य शेजारील तरूण आले, एव्हाना देव्हाऱ्यातून बाळू मदघरात आला होता, त्याने या तरूणांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला, अखेरीस काहीनी त्याला तसा ढकलून घराला दार लावलं.. इकडे तोपर्यत अनुसयाने या गोंधळात ती नारळ सुपारी उचलून पुर्ववत देव्हाऱ्यात ठेवली..

खांडेकरवाडीत कोयता हल्ल्यातील जखमींना गोषटवाडी रस्त्यापर्यत आणण्यात रात्रीचे आठ वाजले. तेथून पाटणला ग्रामीण रूग्णालयात हल्ल्यातील 11 जणांना आणले. त्यातील गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवले. यातील दोघांचा रात्रीच उपचार सुरू असताना मृत्यू झाला, त्यानंतर तीन, चार दिवसांनी चुलतीचाही मृत्यू झाला. पण कोयता हल्ल्याच्या घटनेने दहा दिवस खांडेकरवाडीतील वातावरण सुन्न होतं.

पाटणचे तत्कालीन मंडल पोलीस निरीक्षक भीमराव चाचे यांनी मध्यरात्री संशयित आरोपी बाळू पवारला घरातूनच पाटण पोलीस ठाण्यात आणलं. पण तो विमनस्क होता. आपल्या हातून काय घडलंय, याची त्याला यत्किचिंतही जाणीव नव्हती. परिणामी त्याला घटनेची माहिती दिली, पण तरीही तो शुन्यच होता. इकडे नवऱ्याला पोलीस घेऊन गेलेले, घरातील सासू, सासरे, चुलतसासू, सासरे, पुतणे दवाखान्यात अन् अनुसया एकटीच घरात.. असं चित्र होते. चुलतसासूच्या मृत्यूंनंतर अनुसया हबकून गेली. तिकडे नातेवाईकं अंत्यसंस्कारासाठी गेले, अन् अनुसया देव्हाऱ्यातील नारळ-सुपारी घेऊन घरातून बाहेर पडली, ती कायमचीच.. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, अन् पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तिसऱ्या दिवशी चुलतसासूचे रक्षाविसर्जन विधी झाला. यातील रक्षा कोयना नदीकाठी राममळा येथे टाकण्यास काही जण गेले, तर तिने नदीच्या पात्रात अनुसयाचा मृतदेह आढळला. तेथे तिच्या साडीच्या पदरात बांधलेली नारळ-सुपारी तशीच होती.. या घटनेची नोंद कोयनानगर पोलिसांत झाली. तत्कालीन पोलीस निरीक्षक निवास साळोखे यांनी या घटनेचा तपास केला. मंडल पोलीस निरीक्षक भीमराव चाचे आणि पोलीस निरीक्षक निवास साळोखे यांनी या घटनेचा तपास करताना त्यांना नारळ-सुपारीच्या वाद अन् कोयता हल्ल्याचे हे सुत्र मिळाले, अन् गुन्हा उघडकीस आला.

बाळू पवार आणि पत्नी अनुसया यांच्याबद्दल वाडीत कमालीचा आदर होता. अगदी पाणवठ्यावर पाणी आणायला गेलेला बाळू कधीही कोणाकडे वर मान करून पहायचा नाही, बोलायचा नाही, अशा प्रतिक्रिया समोर आल्या. 7 एप्रिल 2001 रोजी सायंकाळी घडलेल्या या कोयता हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या चौघांपैकी एकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला, त्याच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी बाळूच्या चुलतभावाचा मृत्यू झाला, त्यानंतर दोनच दिवसात चुलत सासूचा मृत्यू झाला, त्यानंतर सासऱ्यांचा, अन् सासूचाही मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांत या कोयता हल्ल्याने 5 जणांचा बळी घेतला. पण यामागील कारण होतं, ते संसारवेलीवर फुल हवं याचं... अन् म्हणूनच अनुसयाने आणलेली नारळ-देव्हाऱ्यात पोहोचली, अन् त्यातून घडलेल्या या नाट्यातून आक्रित घडलं. नारळ सुपारीचा वाद अन् कोयता हल्ला अशीच या खटल्याची ओळख सातारा जिल्ह्यात राहिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article