कोको गॉफ उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ रियाध, सौदी अरेबिया
अमेरिकेच्या कोको गॉफने पोलंडच्या इगा स्वायटेकवर दुसरा विजय मिळवित डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या निकालामुळे स्वायटेक या आठवड्यात महिलांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानापेक्षा वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे बेलारुसची एरिना साबालेन्का नंबर वन खेळाडू म्हणून वर्षाची अखेर करेल. तिला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे. कोको गॉफने स्वायटेकवर 6-3, 6-4 अशी मात करीत 2023 सिनसिनॅटी स्पर्धेनंतर पहिला विजय नोंदवला. याआधी स्वायटेक सलग चारवेळा गॉफला हरविले असून गॉफला ही मालिका खंडित करण्यात येथे यश आले. गॉफने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये स्वायटेकची सहा सामन्यात अपराजित राहण्याची मालिकाही खंडित केली. ऑरेंज ग्रुपमध्ये गॉफ 2-0 अशी आघाडीवर आहे तर स्वायटेकने 1-1 अशी बरोबरी केली आहे. स्वायटेकने पहिल्या सामन्यात क्रेसिकोव्हाचा पराभव केला होता. क्रेसिकोव्हाने आपल्या दुसऱ्या सामन्यात जेसिका पेगुलाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच करण्याची आशा निर्माण केली आहे. पेगुलाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पहिल्या सामन्यात तिला गॉफने हरविले होते.