कोको गॉफ तिसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेची महिला टेनिसपटू कोको गॉफने आपली आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक केली असून तिने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.
दुसऱ्या सामन्यातील फेरीत गॉफने अर्जंटिनाच्या मारिया कार्लेचा 6-1, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. गॉफने हा सामना दीड तासांच्या कालावधीत जिंकला. गॉफ ही अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. या स्पर्धेत अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्स आणि इमा नेव्हारो यांनी आपले सामने जिंकून पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॉलिन्सने कॅरोलिनी वोझनियाकीचा 6-3, 3-6, 6-3 असा पराभव केला. गॉफचा पुढील फेरीतील सामना क्रोएशियाच्या डोना व्हेकीकशी होणार आहे. व्हेकीकने दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या बिनाका अॅन्ड्रेस्क्युचा 6-3, 6-4 असा पराभव केला. पुरूषांच्या विभागात नॉर्वेचा कास्पर रूड, ग्रीसचा सित्ससिपेस यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.