दोन हजार कोटींचे कोकेन जप्त
दिल्ली पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, संशयित सूत्रधारालाही अटक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने कोकेन या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. हा साठा 500 किलोचा असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 हजार कोटींहून अधिक आहे. नजीकच्या भूतकाळातील हा सर्वात मोठा साठा असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीतल्याच एका अंमली पदार्थ माफियाने मागविलेला हा साठा असल्याचा पोलिसांना संयश आहे. या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ विक्रेत्यांना आणि माफियांना अटक करण्यात आली आहे.
हे कोकेन कोणत्या देशातून मागविलेले होते, याचा अद्याप शोध लागलेला नाही. तथापि, आतापर्यंतच्या अनुभवानुसार हा साठा पाकिस्तानमधून आला असावा, असा संशय आहे. दिल्ली आणि भारतातील इतर मोठ्या शहरांमध्ये पुरवठा करण्यासाठी हा अंमली पदार्थ आणण्यात आला होता. मात्र, दिल्ली पोलिसांना गुप्तचरांकडून वेळीच संकेत मिळाल्याने माफियांचा डाव उध्वस्त झाला. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून हा साठा पकडला.
माफियांना मोठा दणका
कोकेनचा प्रचंड साठा जप्त झाल्याने राजधानी दिल्ली आणि भारतातील इतर शहरांमधील अंमली पदार्थ माफियांना मोठाच दणका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात व्यापक अभियान चालविले आहे. या अभियानाचे हे सर्वात मोठे यश असून आम्ही यापुढेही अशाच प्रकारे प्रयत्नशील राहू, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिली.
ट्रकमध्ये लपविलेला साठा
कोकेनचा हा साठा दिल्लीच्या शेजारी असणाऱ्या एका राज्यातून ट्रकमध्ये लपवून दिल्लीत आणण्यात आला होता. मोठ्या पिशव्यांमध्ये तो दडविण्यात आला होता. या पिशव्या वरुन अन्य पदार्थांच्या असल्याचे भासावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. तथापि, पोलिसांना आधीच माहिती मिळाल्याने त्यांनी नेमकेपणाने कारवाई करुन ट्रक आणि कोकेन ताब्यात घेतले आहे. ट्रकचालक आणि या साठ्याचा प्रमुख सूत्रधारही पोलिसांच्या हाती लागला आहे. पुढील चौकशी होत असून लवकरच एका देशव्यापी अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड होईल अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून देखरेख वाढविली आहे.
50 लाख डोसेस इतका साठा
बुधवारी जप्त करण्यात आलेल्या कोकेनचा साठा हा 50 लाख डोसेस होतील इतका मोठा आहे. तो जप्त करण्यात आल्याने कित्येक हजार व्यक्तींचे प्राण वाचलेले असू शकतात. सध्या भारतात अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अंमली पदार्थांना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत, अशी माहिती कुशवाह यांनी दिली.